BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑक्टो, २०२१

मंगळवेढ्याकडे निघालेल्या तीन भाविकांना कारने चिरडले





उमदी : मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील यात्रेस पायी चालत निघालेल्या तीन भाविकांना एक चार चाकी वाहने चिरडले असून तिन्ही भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 

पायी चालत वारी करणे अथवा देवाच्या दर्शनाला जाण्यात भाविकांची मोठी श्रद्धा असते पण पायी चालत जाणाऱ्या भाविकांना रस्त्यात अपघात होतात. पंढरीच्या वारीला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते आणि अशावेळी त्यांना ट्रकने चिरडल्याच्या असंख्य घटना आजवर घडल्या आहेत. अशाच प्रकारची दुर्दैवी घटना जत तालुक्यातील उमदीजवळ घडली आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया यात्रेसाठी पायी चालत निघालेल्या भाविकांना अपघाताला सामोरे जावे लागले. हुलजंती येथे महालिंगराया आणि बिरोबा गुरु शिष्य भेटीचा पालखी सोहळा आठवडाभर सुरु असतो. या यात्रेसाठी कर्नाटक राज्यासह आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गोवा आदी राज्यातून भाविक येत असतात. मंगळवेढा तालुक्यातील ही यात्रा महत्वाची मानली जाते त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते.  याच यात्रेसाठी कर्नाटकातून निघालेल्या भाविकांवर उमदी पासून दोन किमी अंतरावर काळाचा घाला घातला गेला. 


उमदीयेथून हे भाविक पायी जात असतानाचा पुण्याहून रायचूरच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच १२ एमडब्ल्यू ८५९८) एका चार चाकी वाहनाच्या अपघाताचे बळी पडावे लागले आहे. उमदी - मंगळवेढा रस्त्यावर हा विचित्र अपघात झाला आहे. भरधाव वेगाने निघालेल्या चार चाकी गाडीचा टायर अचानक फुटल्याने अत्यंत भयानक आणि भीषण अपघात घडला. टायर फुटल्याने हे चार चाकी वाहन अनियंत्रित झाले आणि पायी चालत जाणारऱ्या भाविकांच्या अंगावर गेले. दिशाहीन झालेल्या या वाहनाने अक्षरशः या भाविकांना चिरडले आणि तीनही भाविक जागीच  ठार झाले. या कारने एका मोटार सायकलस्वारालाही धडक दिली नंतर हे वाहन आडवे होऊन भाविकांच्या दिंडीत घुसले, दिंडीतील तिघांना या वाहनाने चिरडले आणि एकच गोंधळ उडाला.  लिंगसूर तालुक्यातील यादभावी येथील ३२ वर्षे वयाचे बसवराज उर्फ बसप्पा दुर्गाप्पा चिंचवडे, आणि नागप्पा सोमण्णा अचनाळ (वय ३४), देवभुसर येथील ४० वर्षे वयाचे म्हानाप्पा दुर्गाप्पा गोंदीकल हे तिघेजण या अपघातात जागीच ठार झाले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कार चालक जखमी झाला आहे. अपघात होताच उमदी येथून मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी जखमींना मदत केली.  या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून पायी यात्रा करणाऱ्या भाविकांसाठी पुन्हा एकदा धोक्याची मोठी सूचना मिळाली आहे. 

पंढरपूर येथील प्रत्येक यात्रेच्या वेळी राज्याच्या विविध भागातून भाविक पायी चालत येत असतात. महिन्याच्या एकादशीच्या निमित्तानेही पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या आधी अशा भाविकांना मोठ्या वाहनांनी चिरडण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत पण आता हा धोका अधिक वाढला आहे. राज्यातील बहुतेक महत्वाचे रस्ते सिमेंटचे बनविण्यात आलेले असून ते रुंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून धावणारी वाहने अत्यंत वेगाने धावत असतात. गेल्या काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण अधिक पटीने वाढलेले आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरून पायी चालणे हे अधिक धोक्याचे बनू लागले आहे.

      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !