BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२१

पंढरपूर नगरपालिकेत वाढणार पाच नगरसेवक !

✪ आज बसुबारस ! दिवाळीची सुरुवात, प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव... आमच्या सर्व वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांना खूप खूप शुभेच्छा ! शोध न्यूज ✪


सोलापूर : राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात ३५ तर पंढरपूर नगरपालिकेत ५ नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या अनेकांच्या नजरा या निर्णयावर खिळलेल्या आहेत. 

राज्यातील विविध शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्या तुलनेत विकास होताना दिसत नाही. शहरातील विकासाचा वेग वाढण्याची आवश्यकता असून या दृष्टीने राज्य शासनाने महापालिका, नगरपालिकामधील निर्वाचित सदस्यांची संख्या १७ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. त्यामुळे विविध शहरातील नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचे स्वागत केले आहे. 

एकेका प्रभागात एकाच पक्षाचे अनेकजण नगरसेवक होऊ इच्छित असतात पण यातील एकालाच संधी मिळत असते. नगरसेवक होण्याचे स्वप्नं पाहत अनेकांनी अनकेवर्षे जनसंपर्क वाढवलेला असतो पण ऐनवेळी त्यांची निराशा होत असते. विविध शहरातील लोकसंख्या वेगाने वाढत असते पण त्या तुलनेत शहराचा विकास होत नसतो त्यामुळे सदस्यांची संख्या वाढविली जावी अशी शासनाची संकल्पना आहे. निवडून दिलेले अनेक नगरसेवक जनतेची किती 'सेवा' करतात याचा अनुभव नागरिक घेत असतातच पण शासनाच्या धोरणानुसार या सदस्यांची संख्या वाढवली जाणार आहे त्यामुळे आणखी काही कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

जनगणनेवर आधारित या सदस्यांची संख्या अवलंबून असली तरी गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांचीच सगळी गणिते चुकत गेली आहेत. सन २०२१ ची जनगणना आणि त्याचे अहवाल कोरोनामुळे मिळू शकले नाहीत त्यामुळे लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग विचारात घेत अधिनियमातील महापालिका आणि नगरपालिका यांच्या सदस्य संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून प्रत्येक नगरपालिका हद्दीत आपापल्या शहरापुरती गणिते सुरु झाली आहेत. राजकारणात काम करणारे अनेक तरुण गेल्या काही दिवसांपासून आकडेमोड करू लागले असून शासनाचे नेमके धोरण कसे असेल याचा अंदाज बांधला जात आहे. सोलापूर जिल्यात दहा नगरपालिकात ३५ सदस्य वाढतील असे सांगितले जात असून पंढरपूर नगरपालिकेत ५ सदस्यांची भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.   

सोलापूर जिल्ह्यात नव्या सदस्यांची संख्या ३५ ने वाढण्याची शक्यता असून जिल्ह्यात केवळ बार्शी नगरपालिका 'अ' वर्गात आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट या दोन नगरपालिका 'ब' वर्गात आहेत. बाकी करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला, मंगळवेढा, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ या सातही नगरपालिका 'क' वर्गातील आहेत. महापालिका आणि नगरपरिषदा यांच्यासाठी घेतलेला सदस्य वाढीचा निर्णय नगर पंचायतीसाठी लागू केला जातोय की नाही याबाबत अद्याप तरी नेमके स्पष्टीकरण नाही. 

सोलापूर जिल्ह्यातील दहा नागरपालिकांतून निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या २६५ एवढी आहे, ही संख्या ३५ ने वाढणार असून बार्शी येथे ६, पंढरपूर येथे ५, अक्कलकोट येथे ४ तर मोहोळ येथे २ नगरसेवक वाढणार आहेत.  उर्वरित नगरपालिकातून प्रत्येकी ३ नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने संख्यावाढीचे धोरण जाहीर केल्यापासून राजकारणात याची प्रचंड उत्सुकता असून अनेकजण 'तयारी' लाही लागले आहेत. 

     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !