BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२१

दिवाळीसाठी मामाच्या गावाला जाताना अपघातात तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू !




माढा : मोठ्या आनंदाने दिवाळीच्या सणासाठी मामाच्या गावी निघालेल्या एका तीन वर्षाच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून माढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून या सणासाठी आपल्या मामाच्या गावी जाण्याची ओढ प्रत्येक मुलाला असते. दिवाळीचा एक वेगळाच आनंद मामाच्या गावी त्यांना मिळत असतो. पण एका बालकाचं दुर्दैव आड आलं आणि मामाची भेट होण्याआधीच त्याला काळानं अर्ध्या वाटेवरच गाठलं ! कुर्डू ते माढा या दरम्यानच्या रस्त्यावर झालेल्या अपघातानं तीन वर्षाच्या बालकाचं जीवन संपलं तर त्याच्या आईलाही जखमी व्हावं लागलं आहे. 

माढा तालुक्यातील कुर्डू येथील माळी पाटीजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन हा अपघात घडला आहे. उरुळी कांचन येथील शरद अनंत बोराडे हे आपली पत्नी विनय आणि तीन वर्षे वयाचा मुलगा शिवराज याला  दुचाकीवरून घेऊन माढा येथे निघाले होते. दिवाळी सणासाठी विनया आणि त्यांच्या मुलाला सासुरवाडीला सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. कुर्डू येथे माळी पाटीजवळ आल्यानंतर यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. जोराची धडक देऊन टेम्पो पळून गेला. 

या अपघातात तीन वर्षे वयाचा शिवराज जागीच गतप्राण झाला तर शरद अनंता बोराडे (वय २९) सौ.  विनया शरद बोराडे (वय २८) हे दोघे जखमी झाले असून त्यांना मोठया प्रमाणात मार लागला आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  उरळीकांचनपासून दुचाकीवर निघालेलं बोराडे कुटुंब माढ्याच्या जवळ पोहोचलं होतं आणि आता काही वेळेत ते आपल्या माणसात आनंद उपभोगणार होते. लेक आणि जावई येत असल्याने माढ्याच्या चव्हाण कुटुंबातही आनंद होता. काही वेळेत लेक आणि जावई पोहोचत असल्याने घरात आनंदाचे वातावरण असतानाच अपघाताची ही बातमी आली आणि  ऐन दिवाळीच्या आधीच या घरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले.   

अलीकडे दुचाकीचेच अधिक अपघात होत असून गेल्या काही दिवसात दुचाकी अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे दूर अंतरावरून दुचाकीचा प्रवास केला जातो. सगळीकडेच महागाईने आग लावली असल्यामुळे मध्यमवर्गीय माणूस दुचाकीलाच पसंती देतो पण हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढलेली आहे आणि वाहने अत्यंत बेदरकारपाने चालवली जात आहेत.  दुचाकीवरून, विशेषतः कुटुंबासह प्रवासाला निघण्यापूर्वी विचार करण्याची वेळ आता आली आहे.       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !