BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२१

व्यक्तिगत तक्रारी गांभीर्याने घेत नाही, निस्तरायला आम्ही खंबीर !



पंढरपूर : काहीही गैरप्रकार नसताना केलेल्या व्यक्तिगत तक्रारीला आम्ही गांभीर्याने घेत नाही, तक्रारी उद्भवल्यास त्या निस्तरण्यास आम्ही खंबीर आहोत, शेतकऱ्यांचेच नुकसान करणाऱ्या तक्रारी कुणी करू नयेत अशा शब्दात आज 'सहकार शिरोमणी' चे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सुनावले आहे. 

पंढरपूर तालुक्यात 'राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी' असा कार्यक्रम अद्यापही सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी  राष्ट्रवादीचेच नेते कल्याणराव काळे यांच्याविरोधात ईडी, आयकर तसेच अन्य यंत्रणांकडे गंभीर आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारी केल्या आहेत. साहजिकच यावर काळे यांचे प्रत्युत्तर येणे अपेक्षित होते त्याप्रमाणे आज कल्याणराव काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली 'शांत' तोफ डागत वस्तुस्थितीत शेतकऱ्यांच्या समोर मांडली आहे. 

आमच्यापर्यंत अद्याप कुठल्याही चौकशीची नोटीस आलेली नाही, नोटीस आल्यानंतर बघू, मेलद्वारे काही तक्रारी दिल्यात असे आमच्या कानावर आले आहे. अशा तक्रारी करणे म्हणजे शेतकऱ्यांची अडवणूक करणे आहे असे माझे मत आहे. साखर कारखाने चालवणे एवढे सोपे राहिलेले नाही, अशा तक्रारीमुळे बँकांनाही अडचणी येतात, तक्रारी करून मार्ग निघत नसतो. व्यक्तिगत तक्रारी नसाव्यात, तुम्ही भांडा, काही अडचणी आल्या  तर सांगा, तहसीलदार प्रांत यांच्यासारखे अधिकारी आहेत. शेतकऱ्यांचा सर्व एफआरपी आम्ही दिला आहे, त्यामुळे व्यक्तिगत तक्रारी आम्ही गांभीर्याने घेत नाही, काही तक्रारी आल्या तरी त्या निस्तरण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. अशा आक्रमक शब्दात परंतु अंत्यंत शांतपणे कल्याणराव काळे यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

"आम्ही कारखाने उभे केले आहेत, आम्ही कोठे जमिनी घेतल्या नाहीत की फाईव्ह स्टार हॉटेल्स उभे केले नाहीत, आमचा कुणाचाही उतारा काढून पहा, प्रत्येक उताऱ्यावर तुम्हाला बोजाच दिसेल. त्यामुळे भांडून काही उपयोग होणार नाही. अशा तक्रारी करून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये एवढेच आपले म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या देण्यासंबंधी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या संस्थांच्या तपासण्याही झाल्या आहेत पण कुठेच काही आढळून आलेले नाही" असे स्पष्टपणे आणि ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांनी संभ्रमात राहण्याची गरज नाही, सीताराम कारखान्याची शंभर रुपयांची एफआरपी बाकी होती. लोक झोपेत असताना त्यांना ही रक्कम जमा झाल्याचे मेसेज गेले आहेत. कुठे गाठोडे बांधून कल्याणराव काळे यांनी पैसे ठेवलेत असे नाही' असे सांगून शेतकऱ्यांना त्यांनी पुन्हा आश्वस्थ केले आहे. 

सहकारी साखर कारखान्याबाबतही काही लोक  अलीकडे जाणीवपूर्वक तक्रारी किती असल्याचे दिसत आहे. शेतकरी संघटनाही तक्रारी करतात पण त्या एफआरपीचे मागणी करीत असतात. शेतकरी संघटना कधी व्यक्तिगत तक्रारी करीत नाही. काही ठराविक लोक मात्र व्यक्तिगत रोषापोटी मागच्या वर्ष दीड वर्षांपासून तक्रारी करायला सुरुवात केली आहे. इकडे खाली सांगायचे. 'शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजेत आणि जेथून आम्हाला पैसे मंजूर होतात तेथे जाऊन सांगायचे, 'यांचे पैसे मजूर करू नका म्हणून' !  या गोष्टी योग्य नाहीत. असेही त्यांनी सांगितले. 

ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांनाच आम्ही सीताराम महाराज कारखाना चालविण्यास दिला आहे, शेअरच्या रकमा देण्यास आम्ही बांधील असून लवकरच या रकमाही दिल्या जातील. कुणाचा एक रुपयाही बुडणार नाही. येत्या सहा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व रक्कम दिली जाणार आहे, दोन्ही साखर कारखाने सुरु झाल्यामुळे काहींची झोप उडाली आहे.  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण ऊस गाळप होत नाही तोपर्यंत 'सहकार शिरोमणी' आणि 'सीताराम कारखाना' बंद होणार नाही असा विश्वासही काळे यांनी दिला आहे.  

असे उठले 'वादळ' ! 

 पंढरपूर तालुक्यातील नेते आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे नेते कल्याणराव काळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी चे माजी तालुकाध्यक्ष ऍड दीपक पवार यांनी ईडी आणि आयकर विभागाकडे कोट्यवधीच्या घोटाळ्याची तक्रार केली आहे. 

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन काळे यांच्यावर ३५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सीताराम महाराज साखर कारखान्याचे शेअर्स देतो म्हणून शेतकरी, कामगार, शिक्षक, वाहन मालक अशा जवळपास १५ हजार लोकांकडून ३५ कोटी गोळा केले आणि घोटाळा केला असा गंभीर आरोप केला आहे. कल्याणराव काळे यांच्या विरुद्ध थेट ईडी, आयकर विभाग, सेबी तसेच पोलीस यांच्याकडे मोठी तक्रार केली आहे. 

लवकरच या प्रकरणाची चौकशीस सुरु होईल असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे ऍड पवार यांनी सांगितले तसेच या चौकशीत मोठा घोटाळा समोर येईल असेही पवार म्हणाले आहेत पण त्याच दिवशी काळे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. सर्व आरोप चुकीचे असून शेतकऱ्यांनी या आरोपावर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही काळे यांनी केले होते.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !