पाकिस्तानच्या खेळाडूंचे कौतुक करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याला अटक करणार काय असा खोचक सवाल राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीरपणे विचारला आहे.
टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केल्यापासून संघावर टीका होत असताना राजकारणाचाही शिरकाव झाल्याचे दिसू लागले आहे. पाकिस्तानकडून पराभव झाल्याने भारतीय रसिकांचा मोठा हिरमोड झालेला आहे. भारत आणि पाकिस्तान संघातील क्रिकेट सामना म्हणजे एक प्रकारे युद्धच असते आणि भारत, पाकिस्तानमधील प्रेक्षक या सामन्याकडे केवळ खेळ म्हणून पाहत नाहीत त्यामुळे हा सामना नेहमीच वेगळ्याच दबावाखाली असतो. खेळाडूनाही हा सामना खेळताना मोठे दडपण असते. अशातच भारतीय संघ पाकिस्तान संघाकडून पराभूत झाल्याने स्वाभाविकपणे संघाला टीका सहन करावी लागत आहे.
पाकिस्तान संघाने विजय मिळविल्यानंतर भारतीय क्रिकेटशौकीन प्रचंड नाराज झालेले असतानाच भारतात पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष साजरा होण्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाके फोडून पाकिस्तानच्या विजयाचा आनंद भारतात साजरा करण्यात आला आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा प्रकार पाहून भारतीयांच्या भावना अधिकच प्रक्षुब्ध झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर येथे अशा नागरिकावर 'मानवतावादी आधारावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक' कायद्याखाली (Unlawful Activities Prevention Act) कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचे स्वागत होत असतानाच विरोध होत असल्याचेही समोर आले आहे.
भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानला मिठी मारली. भारताने सामना गमावला असाला तरी पाकिस्तानमध्ये देखील विराटची जोरदार चर्चा रंगली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक फोटो शेअर करून कर्णधार विराट कोहलीची देखील स्तुती केली आहे. भारतात मात्र या मिठीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केले तर त्याला युएपीए अंतर्गत अटक करणार का?, असा प्रश्न महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि क्रीडा क्षेत्रातही वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !