पंढरपूर : 'पाकिस्तानात जाईन पण लस घेणार नाही, आम्ही मेल्यावर तुम्ही जिम्मेदार रहा, तसं पन्नास रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या'! असे तारे तोडत आरोग्य सेविकेशी हुज्जत घालणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोरोनाशी दोन हात करता करता आरोग्य विभाग थकला आहे, गेल्या पावणे दोन वर्षांपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि डॉक्टर यांनी अविरत परिश्रम केले आहेत. विक्रमी लसीकरण झाल्याने कोरोनावर नियंत्रण मिळाले आहे आणि लस घेण्याचे आवाहन सरकार सातत्याने करीत आहे पण दुनियेत असे काही नमुने आहेत की ते या लसीला मानत नाहीत की आरोग्य विभागाने तळमळीने केलेल्या विनंतीला मान देत नाहीत. कोरोनापेक्षा अज्ञानाशी लढण्याचीच अधिक गरज आजच्या काळात आहे हे विशेष !
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळत नाही पण समाजात माणसांचे काय नमुने असतात याचे दर्शन मात्र होत आहे. या व्हिडीओमधील संवाद मराठी असल्याने ही घटना महाराष्ट्रातील आहे हे मात्र नक्की ! आपल्या आजूबाजूलाही असे नमुने हमखास पाहायला मिळालेले असतात पण हा नमुना लस घ्यायचे नाव घेताच एवढा संतापला आहे की त्याची पाकिस्तानात जाऊन रहायची तयारी आहे. त्याचं आणि त्याच्या कुटुंबीयांचं रक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी त्याच्या दारापर्यंत पोहोचले पण हा बहाद्दर त्यांनाच ज्ञान देण्याचं काम करू लागला आहे.
'लस घेऊन आमच्या परिवारातील कुणी माणूस मृत्युमुखी पडलं तर त्याची सगळी जबाबदारी तुम्ही घ्यायची आणि तसं पन्नास रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून द्यावं अशी मागणीही हा बहाद्दर करताना दिसत आहे. एवढंच नाही तर 'चार माणसं माझ्या गावातली मेलीत लस घेऊन' असं सांगत तो काही माणसांची नावं देखील घेत आहे. आरोग्य सेविका त्याला तळमळून सांगत आहे पण हा पठ्या काही समजून घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही !
कोरोनाची लस शासन मोफत देत असताना लसीबाबत अनेकांनी गैरसमज करून घेतला आहे. मोठ्या प्रयत्नाने लस निर्माण करण्यात आली आणि लस मिळाली तेंव्हा देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला. प्रारंभीच्या काळात मागणीप्रमाणे लस मिळाली नाही त्यावेळी लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळत राहिली. आता लस मिळत आहे पण ती घेण्यासाठी स्वेच्छेने पुढे येणारऱ्यांची संख्या घटलेली दिसत आहे. कोरोना परतीच्या मार्गावर निघाल्याने अनेकांना आता या लसीची आवश्यकताच नसल्याचे वाटू लागले आहे. कोरोनाची लस घेतली तर जीवनाला धोका होऊ शकतो असा अज्ञानी समज काहींनी केल्याचे दिसून आले आहे.
समाजात आजही एवढे अज्ञान असेल तर साथीच्या रोगापासून शासनाने लोकांचे प्राण वाचवायचे तरी कसे ? आपण खूप प्रगत झालो, उच्च शिक्षित झालो असा टेम्भा मिरवताना आपल्याला गर्व वाटतो खरा, पण याच समाजात असे अज्ञानी लोक असल्याचे पाहिल्यावर हा गर्व कुठल्याकुठे निघून गेल्याशिवाय राहील काय ? सरकार दारापर्यंत येतेय आणि मोफत लस देतेय पण म्हणतात ना, 'गाढवाला गुळाची चव काय' ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !