BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जाने, २०२४

शिवसेनेच्या जेष्ठ आमदारांचे निधन ! चार वेळा निवडून गेले होते विधानसभेत !



शोध न्यूज : चार वेळा निवडून विधानसभेत दाखल झालेल्या शिवसेनेच्या जेष्ठ आमदारांचे निधन झाले असून मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. न्युमोनियामुळे काही दिवस ते आजारी होते त्यात त्यांचे  निधन झाले आहे.


खानापूर - आटपाडी मतदार संघातील शिवसेनेचे जेष्ठ आमदार अनिल बाबर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून या घटनेने अनेकाना धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले आमदार बाबर हे, शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले होते. त्यांना न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना मंगळवारी सांगली येथील  रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. परंतु आज बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. (Senior MLA of Shiv Sena passed away) वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मतदारसंघात तसेच कार्यकर्त्यात शोकाची काळी छाया पसरली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात त्यांचा  जन्म झाला होता आणि बाबर यांनी वयाच्या अवघी १९ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला  होता.


शिवसेनेत फुट पडली तेंव्हा  या बंडाळीत ते आघाडीवर होते. शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणात पहिल्या सोळा आमदारांच्या यादीत त्यांचे नाव होते. शिंदे गट जेव्हा गुवाहाटी येथे गेला होता त्यावेळी सुरुवातीपासून बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. आटपाडी मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून  त्यांची ओळख होती. दोन दिवसांपूर्वीच शिडे गटातील मंत्री शंभूराज देसाई  यांचं कुटुंबात एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, या विवाह सोहळ्यासाठी बाबर हे उपस्थित राहिले होते आणि त्यानंतर त्यांना काही त्रास जाणवू लागला. त्यांना रुगणालयात दाखल केले तेंव्हा त्यांना न्युमोनिया झाल्याचे समोर आले. आमदार अनिल बाबर यांच्या पत्नींचे काही दिवसापूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर आता बाबर यांचे देखील निधन झाले. बाबर यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !