BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२४

उपकारांची परतफेड! शेतकरी कुटुंबियांनी बैलाच्या मृत्यूनंतर बांधली समाधी !

 


शोध न्यूज : आपल्यासाठी राब राबलेल्या बैलाच्या उपकाराची मोठी परतफेड एका शेतकऱ्याने केली असून बैलाच्या मृत्युनंतर त्या बैलाची समाधी बांधून ऋण फेडण्याचा प्रयत्न या बळीराजाने केला आहे. 

शेतात बैल राब राबतो तेंव्हा त्याच्या मालकाला भाकरी मिळते, अलीकडील  काळात ट्रॅक्टरने बैलाची जागा घेतली असली तरी, अजूनही गरीब शेतकऱ्याच्या शेतात बैलच  काम करीत असतात. सकाळपासून विनाविश्रांत हे बैल शेतात राबत असतात. प्रसंगी चाबकाचे फटकारे देखील त्याला खावे लागतात.  अनेक शेतकरी आपल्या बैलांना आपल्या मुलासारखे जपत असतात. त्याची तहान भूक देखील सांभाळत असतात. जनावरे मुकी असली तरी ते प्रामाणिक कष्ट करून, मालकाच्या घरात दोन  घास पोहोचवत असतात. साहजिकच मालक देखील या बैलावर जीवापाड प्रेम  करीत असतात. आपल्या बैलाचा मृत्यू झाला तर मालकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही एवढा लळा लागलेला असतो. मावळमधील एका शेतकऱ्याने तर या बैलाच्या उपकाराची मोठी जाणीव ठेवली आणि त्याची समाधी देखील बांधली आहे. 

मावळ मधील नानोलीगावाचे  शेतकरी राहुल जाधव यांच्याकडे खंड्या नावाचा एक बैल होता. हा बैल त्यांचा जीव की प्राण होता आणि जाधव हे त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करीत होते. या खंड्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आणि जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलासारखं जपलं पण खंड्या सोडून गेला हे या कुटुंबाला सहन झालं नाही. आपल्यासाठी राबलेल्या या खंड्याला विसरणं देखील त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्याची आठवण कायम राहावी म्हणून खंड्याची समाधी या जाधव कुटुंबाने बांधली. मावळ परिसरात बैलगाडी शर्यत खूप लोकप्रिय आहे आणि याच शर्यतीत खंड्या धावत असायचा. अशाच शर्यतीत धावताना खंड्याने 'घाटाचा राजा' हा मान मिळवला पण त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा शेवट झाला. या कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार तर केलेच पण त्याचा दशक्रिया विधीही करण्यात आला. शिवाय खंड्याची समाधी देखील बांधण्यात आली आहे. 

बैलगाडीच्या शर्यतीत या खंड्याने अनेक विक्रम केले होते. महाराष्ट्र केसरी असा लौकिक मिळवलेल्या या खंड्याने तब्बल ६५ शर्यती जिंकल्या होत्या.   शेवटच्या क्षणी देखील खंड्या या बैलाने 'घाटाचा राजा' होण्याचा मान मिळवला. या बैलाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून जाधव कुटुंबियांनी आपल्या घराशेजारीचत्याची समाधी उभारली आहे. (A farmer family built a tomb for a bull)जाधव यांनी बैलाचे उपकार जपत त्याच्यासाठी दाखवलेले प्रेम हे सर्वांसाठीच एक आदर्श ठरले असून परिसरात या प्रेमाची चर्चा केली जात आहे. जाधव कुटुंबाचे देखील कौतुक होत आहे. माणूस माणसांच्या उपकाराची देखील आठवण ठेवत नसल्याचे आज दिसून येत असते, जाधव कुटुंबाने मात्र या बैलाच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !