BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२४

हजारो मृतदेहाची चिरफाड करणारी संतोषी दुर्गा अयोध्येच्या वाटेवर !

 


शोध न्यूज : हजारो मृतदेहाची चिरफाड करून आपला संसार चालविणाऱ्या संतोषी दुर्गा या महिलेला आता थेट अयोध्येतील राम मंदिराच्या दरबारातून निमंत्रण आले असून, या निमंत्रणामुळे संतोषी भारावून गेली आहे. 


सामान्य माणूस स्मशानात जाण्यासाठीही घाबरतो, बाहेर कितीही बढाया मारणारा व्यक्ती अशा ठिकाणी मध्यरात्री जाण्याच्या बढाया मारतो परंतु प्रत्यक्षात तो पळ काढतो. स्मशानाबाबत जनतेत अनेक समज गैर समज असतात. काही विशिष्ठ प्रसंगात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर, पोलीसांशी प्रकरण निगडीत असेल तर, त्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली जाते, ज्याला पोस्ट मार्टेम असे म्हटले जाते. मृतदेहाची चिरफाड करून उत्तरीय तपासणी करण्यासाठी असलेली खोली देखील अनेकांना भयावह वाटत असते. भर दिवसा  देखील या खोलीकडे कुणी फिरकत नाही. अशा खोलीत एक महिला मृतदेहाची चिरफाड करीत असते. हजारो मृतदेहाची चिरफाड करून डॉक्टरांना मदत करणाऱ्या या महिलेचा वेगळा सन्मान करण्यात आला आहे. (Invitation to Santoshi Durga to Ayodhya) या  महिलेला थेट अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रीतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.


या सोहळ्याच्या निमंत्रणावरून बराच गदारोळ झाला आहे आणि श्री रामाच्या सोहळ्याचे देखील भाजप राजकारण करीत आहे याबाबत देशभरात मोठी टीका होत आहे तर अनेकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार देखील टाकला आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक नामांकित व्यक्तींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे देशातील अति महत्वाच्या व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. आणि अशाच कार्यक्रमात मृतदेहाची चिरफाड करणाऱ्या संतोषी दुर्गा या ३५ वर्षे वयाच्या महिलेस निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणामुळे संतोषी मनापासून सुखावल्या आहेत आणि निमंत्रण पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले आहेत.  उत्तर बस्तर कांकेर जिल्ह्यातील नरहरपूर जिल्हा पंचायतीच्या भगतसिंग वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहणाऱ्या संतोषी दुर्गा या महिलेचीही मोठी चर्चा सुरु झाली आहे.


संतोषी दुर्गा ही महिला गरीब कुटुंबात जन्माला आलेली आहे. तिचे वडील एका आरोग्य केंद्रात शवविच्छेदक सहाय्यक म्हणून नोकरी करीत होते परंतु त्यांच्या व्यसनामुळे त्यांची नोकरी गेली. यावेळी घरातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली त्यामुळे, घरात खाण्याचे वांदे झाले. संतोषी यांना पाच बहिणी होत्या आणि त्यांचे लग्न अजून व्हायचे होते. त्यामुळे लग्न आणि उदरनिर्वाह याची मोठी चिंता होती. या परिस्थितीत संतोषी दुर्गा यांनी वडिलांच्या जागी शवविच्छेदन करण्याची नोकरी स्वीकारली. शवविच्छेदन करणारे बहुतेक सर्व हे दारू पिऊनच हे काम काम करीत असतात पण संतोषी दुर्गा यांनी मात्र दारू न पिता हे काम करण्याच्या अटीवर स्वीकारले आणि एका महिलेने या कामाला सुरुवात देखील केली.


संतोषी यांनी २००४ साली पाहिलं शव विच्छेदन केले, यावेळी त्यांनी अत्यंत कुजक्या अवस्थेतील मृतदेहाचे विच्छेदन केले आणि पुढे त्यांनी हजारो मृतदेहांचे विच्छेदन केले, संतोषी करीत असलेले काम पाहून वडिलांच्या मनालाही वेदना झाल्या आणि त्यांनी दारू पिणे सोडून दिले. दुर्दैवाने त्यानंतर फार काळ ते जिवंत राहू शकले नाहीत. संतोषी मात्र केवळ २६०० रुपयाच्या मानधनावर त्या हे काम करीत आहेत. अशा या महिलेला अयोध्येचे निमंत्रण मिळाले आणि त्या भारावून गेल्या आहेत.  आपल्याला प्रत्यक्षात श्रीरामानेच निमंत्रण धाडले असल्याची त्यांची भावना आहे. पूर्वजन्मी आपल्या हातून काही सत्कर्म घडले असावे म्हणूनच हे निमंत्रण आले असावे, आपण जरुर या सोहळ्यासाठी जाणार आहे असे संतोषी दुर्गा सांगत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !