BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ डिसें, २०२३

एका हातात पेटता टेंभा आणि दुसऱ्या हातात पेट्रोल .... तरुणाचा थरार !




शोध न्यूज : एका हातात पेटलेला टेंभा आणि दुसऱ्या हातात पेट्रोल घेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका तरुणाने केला आणि पोलिसांसह सगळ्यांचीच तारांबळ उडाली.


येत आहे ....नव्या वर्षात ...!

शासन आणि प्रशासन जेंव्हा न्याय देत नाहीत, सामन्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत तेंव्हा समाजातून आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. पण तरीही काही अधिकारी, कर्मचारी, आपली कातडी गेंड्याची असल्याचे दाखवत राहतात तेंव्हा मात्र अस्वस्थ तरुण वेगळ्या मार्गावर जातो.  असाच एक प्रकार सोलापुरात घडला असून, आपल्या मागणीकडे लक्ष दिले जात नसल्याने या तरुणाने, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधण्यासाठी थरारक प्रकार अवलंबला.  सोलापूर जिल्ह्यातील टाकळी टेंभुर्णी येथील व्यायाम शाळेतील भ्रष्टाचाराची तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने दादा कळसाईत या तरूणाने,  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोरच, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका हातात पेटवलेला टेंभा आणि दुसऱ्या हातात पेट्रोलचे कॅन होते. त्यामुळे कुठल्याही क्षणी मोठा धोका होता. हा तरुण  कॅनमधील पेट्रोल अंगावर ओतून घेवून स्वत:ला  पेटवून घेण्याची धमकी देत होता.या घटनेने एकच खळबळ उडाली आणि पोलिसासह अनेकांची पळापळ झाली. प्रसंग बाका होता पण पोलिसांनी कौशल्याने या तरुणाला पकडले त्यामुळे पुढील घटना टळली

 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि तरुणांची आंदोलने यांच्यात एक वेगळेच नाते आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. सोलापुरात देखील त्यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली होती. त्यांच्या आधीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर देखील काही तरुणांनी भंडारा टाकला होता. आता तर चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोरच पेटवून घेण्याचा प्रयत्न दादा कळसाईत यांनी केला आहे.त्यामुळे पाटील यांच्या दौऱ्याला पुन्हा एकदा गालबोट लागले आहे. चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले होते. यावेळी त्यांचा ताफा  श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी निघाला होता. त्यावेळी काही अंतरावरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर कळसाईत हा पालकमंत्र्यांच्या ताफ्याला आडवा गेला. एका हातात पेटलेला टेंभा आणि दुसऱ्या हातात पेट्रोल असल्यामुळे या तरुणाला सावधगिरीने पकडणे आवश्यक बनले होते. उपस्थित पोलिसांनी वेळीच आणि सावधगिरीने या तरुणाला पकडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला गेला पण खळबळ मात्र उडाली.


माढा तालुक्यातील  टाकळी टेंभुर्णी येथील व्यायाम शाळेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अशी या तरुणाची मागणी आहे.  तक्रार दाखल करूनही अधिकारी  त्याची दखल घेत नाहीत  असे म्हणत दादा  कळसाईत यांनी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. (Attempted self-immolation in front of Chandrakant Patil's convoy) ‘साहेब मला न्याय द्या, जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढलाय, तुम्हाला त्रास नको, तुम्ही मागे व्हा, असे म्हणून तो पेटवून घेण्याचा प्रयत्न करीत होता. ताफा पुढे जाताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.  गावातील व्यायाम शाळेत भ्रष्टाचार झाला असून त्यात काही वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत असे तो म्हणत होता. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी देखील तरुणाला आत्मदहन करण्याची परिस्थिती निर्माण होते हे चित्र मात्र नक्कीच विदारक आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !