शोध न्यूज : पंढरपूर - मोहोळ मार्गावर आणखी एक अपघात झाला असून केवळ रस्त्याच्या बेपर्वा खोदकामामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे नागरीकातून संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे.
अपघात ही आता नित्याचीच बाब बनून गेली असून, कुणाच्या तरी बेपर्वाईमुळे आणि प्रत्येकालाच घाई झालेली असल्यामुळे रस्त्यारस्त्यावर अपघात होत आहेत. या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. वाहनांच्या वेगाला मर्यादा राहिली नाही आणि इतरांचे जीव जातात याचीही तमा उरलेली नाही. पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर मात्र एका खोदकामामुळे आणि बेफिकिरीमुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडी जवळ ही दुर्घटना समोर आली आहे. मोहोळ - आळंदी या राष्टीय महामार्गाचे काम सुरु आहे, या कामामुळेच हे दोन बळी गेले आहेत. रस्त्याचे काम करताना, राहिलेल्या चुकीमुळे अनेक अपघात घडलेले आहेत, तसाच प्रकार आता पुन्हा एकदा समोर आला आहे. रस्त्याचे खोदकाम करून मुरूम उकरून टाकण्यात आला होता आणि त्यामुळे सदर रस्त्याचा भाग आपोआपच अरुंद झाला होता, त्यातून अपघाताची ही घटना घडली.
मुरूम रस्त्यालाच टाकला गेला त्यामुळे रस्ता अरुंद झाला आणि यामुळे एक ट्रॅक्टर आणि ट्रेलर येथे पलटी झाला. उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एका कामगाराचा म्रृत्यू झाला तर अन्य चार कामगार जखमी झाले. टाकलेला मुरूम आणि त्याच ठिकाणी ट्रॅक्टर अपघात यामुळे रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली. या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु झाली आणि यातच याच ठिकाणी आणखी एक अपघात घडला, त्यात पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील सचिन तूपलोंढे यांचा बळी गेला. (Two died in an accident on Pandharpur-Mohol road) एका चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या धडकेत तुपलोंढे यांचा मृत्यू झाला. त्यांना एवढा जोराचा मार लागला की, त्यांना रुग्नालायात नेण्याचीही संधी मिळाली नाही. बेपर्वा काम केले जात असल्यामुळे या आधीही याच राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडले आहेत. त्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
टोल नाकाही बेपर्वा !
मोहोळ - पंढरपूर या रस्त्यावर असलेला पेनूर येथील टोल नाका केवळ वसुली करण्यात व्यस्त आहे पण प्रवाशांना कसलीही सुविधा देण्यात त्यांना रस नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रवाशांना कुठल्याही सुख सुविधा न देता ही वसुली मात्र अहोरात्र केली जात असते. अपघाताची घटना घडल्यानंतर रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे तसेच तातडीने क्रेन उपलब्ध करणे ही टोल नाक्याची जबाबदारी आहे पण, येथील टोल नाक्याला वसुलीशिवाय अन्य काहीच माहिती नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या टोल नाक्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे.
अकरा महिन्यांनी गुन्हा !
सोलापूर येथे झालेल्या एका अपघात प्रकरणी तब्बल अकरा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देगाव येथील संजय रामचंद्र काळे यांनी आपल्या ताब्यातील, राज्य परिवहन महामंडळाची बस निष्काळजीपणे चालवत, पायी चालत जाणऱ्या एका व्यक्तीला धडक दिली होती. या धडकेत त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ९ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली होती. त्यानंतर तब्बल अकरा महिने झाल्यावर संजय काळे याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भैय्या चौक येथील नागोबा मंदिरजवळ अपघाताची ही घटन घडली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !