BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑक्टो, २०२२

बालकाचा श्वास कोंडला, एक्स रे पाहून डॉक्टर हादरले !


 



शोध न्यूज : साडे तीन वर्षांच्या मुलाचा अचानक श्वास कोंडला गेला आणि एक्स रे पाहून डॉक्टर देखील हादरले, लहान मुलांकडे पालक किती दुर्लक्ष करतात हे देखील या घटनेने समोर आले.


लहान मुले खेळता खेळता काहीही तोंडात घालतात आणि ते त्यांच्या घशात, अन्ननलिकेत अडकून पडते तेंव्हा लहानग्याच्या जिवालाच धोका उत्पन्न होत असतो. खेळण्यातील अनेक वस्तू लहान मुलांच्या पोटात गेल्या आणि त्याच्या जीवावर संकट आल्याचे आणि डॉक्टरांनी वाचविल्याचे अनेक प्रसंग आपण पहात असतो. अत्यंत जीवघेणे प्रसंग मुलांच्या जीवावर उठत असतात पण पालक मात्र मुलांकडे गंभीरपणे लक्ष देताना दिसत नाहीत. लहान मुल रडायला लागले की त्याच्या पुढे काहीतरी वस्तू टाकली जाते. त्याच्याकडे पाहून मूल खेळायला लागले की आई आपल्या कामात व्यस्त होते. आणि नेमके अशाच वेळी मुलाचे प्राण धोक्यात येण्याची घटना घडत असते. अत्यंत धक्कादायक वस्तू डॉक्टरांनी लहान मुलांच्या घशातून, अन्ननलिकेतून अथवा पोटातून काढलेल्या आहेत.  बुलढाणा जिल्ह्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.



शेगाव येथील आशिर मोहम्मद अमीर या एका साडे तीन वर्षे वयाच्या मुलाला श्वास घेताना त्रास व्हायला लागला, त्याला श्वास घेता येईना आणि काय झालेय ते सांगताही येईना ! सुदैवाने पालकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली पण नेमके काही लक्षात आले नाही. अखेर त्याचा एक्स रे काढण्यात आला आणि हा एक्स रे पाहून डॉक्टर देखील हादरून गेले. पालकांच्या तर पायाखालची जमीन सरकून गेली. खेळता खेळता या लहान मुलाने एक रुपयांचे नाणे गिळले होते आणि ते त्याच्या घशात आडवे अडकले होते. बालकाच्या घशात हे नाणे अडकून पडल्याने त्याला श्वास घेता येत नव्हता आणि काही सांगताही येत नव्हते. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत हा मुलगा श्वास घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत होता. त्याची अवस्था पाहून त्याचे पालक देखील घाबरून गेले होते.


डॉक्टरांनी वेळ न दवडता फोलिज कॅथेटरच्या मदतीने मुलाच्या घशातील एक रुपयाचे नाणे मोठ्या कौशल्याने बाहेर काढले आणि साडे तीन वर्षे वयाच्या या मुलास जिवदान दिले. नाणे बाहेर निघाल्याने मुलाचा प्राण धोक्याच्या बाहेर आला आणि आई वडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेनंतर डॉक्टरांनी लहान मुलांच्या पालकाला महत्वाचा सल्ला दिला असून मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (A rupee coin stuck in the child's throat was removed by the doctor) मुलांनी काही गिळले तर ते आपोआप बाहेर येईल याची वाट पालक पाहतात पण असे करणे मुलांच्या जिवावर बेतू शकते, मुलांचे वय ६ वर्षांचे होईपर्यंत विशेष काळजी घ्यावी आणि अशी काही घटना घडली तर तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.



   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !