शोध न्यूज : केवळ एका फुकटच्या अंड्यासाठी एका नराधमाने गरीब विक्रेत्याचा खून केला असून, पोलिसांच्या हुशारीने आरोपी जाळ्यात अडकला आहे त्यामुळे पोलिसांचे देखील विशेष कौतुक होत आहे.
अनेक भुरटी मंडळी बाजारात काही फुकट मिळतेय काय ? याकडे पाहत असतात, त्यासाठी ते आपली दादागिरी दाखवत असतात आणि गरीब विक्रेत्याला लुबाडत असतात. असे प्रकार गावोगावी असले तरी, त्यासाठी कुणाच्या जीवावर उठतील असे वाटत नव्हते पण आता ते देखील घडले आहे. फुकट अंडी मिळवीत यासाठी एका तळीरामाने चक्क एका विक्रेत्याचा जीव घेतला आहे. खून करण्यापर्यंत ही मजल गेली आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Killing a vendor for a free egg) महाराष्ट्रात देखील बिहार सारखे प्रकार घडू लागले असल्याचेच या घटनेने दाखवून दिले आहे. रस्त्यावर उभे राहून अंडा भुर्जी विकणाऱ्या एका विक्रेत्याचा जीव याच अंड्याने घेतला असून, समाजातील एक वेगळी हैवानियत समोर आली आहे. केवळ फुकट अंडी दिली नाही म्हणून ३२ वर्षे वयाच्या विक्रेत्याचाच थेट खून करण्यात आला असल्याची घटना, बारामती येथे घडली आहे.
अंडा भुर्जी विक्रेता शाहबाज रौफ पठाण हा बारामती येथे कॉलेज रस्त्यावर अंडा भुर्जी विकून आपले पोट भरत होता. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील त्याच्यावरच अवलंबून होता. ३० सप्टेंबरच्या रात्री अंडा भुर्जीची गाडी लावून तो व्यवसाय करीत असताना, एका अज्ञात व्यक्तीने त्याला मारहाण केली होती. या मारहाणीत तो जखमी झाला होता. रुग्णालयात त्याच्यावर उपचार देखील सुरु होते पण, ८ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला होता. अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान होते पण हे आव्हान पोलिसांनी पेलले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तसेच तांत्रिक विश्लेषण देखील करण्यात आले. याच तपासाच्या दरम्यान, नशेत असलेल्या एका व्यक्तीने फुकट अंडी देण्यासाठी, शहाबाज याच्याशी वाद घातला असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली ! त्यामुळे पोलिसांचा तपास सोपा झाला, पोलिसांनी बारामतीच्या तांदूळवाडी येथील प्रवीण भानुदास मोरे याला ताब्यात घेतले. आपल्या पद्धतीने विचारपूस करीत असताना, त्याने हा गुन्हा कबूल केला. फुकटच्या अंड्यासाठी त्याने शहाबाज याचा जीव घेतला होता. या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !