BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२३

उजनी धरणात पाण्याची वेगाने आवक सुरु !


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या आणि यावर्षी तहानलेल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाला असून पुन्हा एकदा बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 


या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने बळीराजाच्या डोळ्यासमोर मोठे संकट दिसू लागले आहे. सोलापूरसह तीन जिल्हे हे उजनी धरणावर अवलंबून असतात आणि या धरणामुळे उजाड शेती हिरवीगार झाली आहे. यावर्षी मात्र पावसाने मोठा  दगा दिला आहे. पावसाळ्याचे दिवस संपत आले तरी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडेच आहेत. आभाळात नसले तरी, शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग जमा झालेले दिसत आहेत. त्यात उजनी धरणालाही ऐन पावसाळ्यात तहान लागली आहे. मागील वर्षी मनमानी पद्धतीने पाणी सोडत राहिले आणि यावेळी त्याचा फटका शेतकरी आणि नागरिक यांना बसत आहे. यावर्षी शेतीसाठी तर नाहीच पण  पिण्यासाठीही पाणी सोडण्यात चालढकल होत आहे. पंढरपूर, सांगोला येथे पिण्याच्या पाण्याचीही  मोठी समस्या निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर ऐन उन्हाळ्यात किती भयानक टंचाई असेल याचा अंदाज कुणालाही येऊ शकतो. 


दरम्यान मान्सून पुन्हा परतला असून जाता जाता तो बरसून जाणार असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अर्थात आता या अंदाजावर देखील शेतकरी पूर्ण विश्वास ठेवायला तयार नाहीत कारण, पावसाला सुरुवात होण्याआधीपासून हे अंदाज येत आहेत, पाऊस मात्र येत नाही. आता पुन्हा हवामानाचा अंदाज आलेला असून राज्यात सगळीकडे चांगला पाउस होईल असे सांगण्यात आला आहे. (Rapid inflow of water into Ujani dam) या अंदाजाप्रमाणे पाऊस सुरु झाल्याचे दिसत असून, त्याचा परिणाम उजनी धरणावर देखील जाणऊ लागला आहे. आज उजनी धरणात विसर्ग येवू लागला आहे त्यामुळे आशा पल्लवित होताना दिसत आहेत.


सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी, पुणे आणि मावळ  परिसरात पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या १९ धरणांपैकी ७ धरणामधून कमी अधिक विसर्ग सोडला जाऊ लागला आहे. सदर विसर्गात वाढ देखील होऊ शकते. कारण आजही पुणे परिसरात चांगला पाउस झाला आहे, काल ५९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज ५९२ मिमी पाऊस झाला आहे. या पाण्याचा उपयोग उजनी धरणाची तहान भागाण्यासाठीच होत असतो. उजनीच्या वर असलेल्या सात धरणामधून 23 हजार ७८१  क्युसेक्सने विसर्ग उजनीच्या दिशेने येऊ लागला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. पुणे, मावळ, लोणावळा भीमाशंकर परिसरात पावसाचा जोर वाढताना दिसत असून, त्याचा मोठा फायदा आता उजनी धरणाला होत आहे. सद्या येत असलेल्या २३ हजार ७८१ चा विसर्ग उद्या संध्याकाळ पर्यंत २० हजारावर जाऊ शकतो असा जलसंपदा विभागाचा अंदाज आहे. पावसाचा जोर वाढत राहिल्यास या विसर्गात निश्चित वाढ होणार असून, या विसर्गाने उजनीचा जलसंचय नक्कीच वाढणार आहे. 


उजनी धरणाची आजची टक्केवारी १८.६ टक्के आहे, वरील धरणातून सोडण्यात येणारे पाणी अजून उजनीत पोहोचले नाही परंतु उद्या शनिवारी (९ ऑगस्ट) सकाळपासून उजनीची टक्केवारी वाढलेली दिसणार आहे.  एकंदर उजनीची पाणी पातळी दोन तीन दिवसात वाढलेली असणार आहे. पिण्यासाठी पाण्याची मागणी  होत असतानाच, धरणाची पातळी वाढू लागल्यामुळे शेतीसाठीही पाणी  मिळणार काय ? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !