म्हसवड : सातारा जिल्ह्यातील म्हसवड- पंढरपूर मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला भीषण आग लगली असून या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने आधीच एस. टी. संकटात असताना या भीषण आगीची घटना समोर आली आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर धुळदेव येथे बसला आग लागली आणि काही क्षणात आगीने संपूर्ण बसचा ताबा मिळवला. सातारा आगाराची ही बस सोलापूरकडे निघालेली होती. बसमधून आगीच्या ज्वाळा बाहेर उफाळताना दिसत होत्या. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आग लागताच तातडीने म्हसवड नगरपालिकेचे अग्निश्सामक दल दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण आणले.
बसला आग लागताच आजूबाजूचे नागरिकही घटनास्थळी जमा झाले, त्यांनीही आग आटोक्यात आणण्यास मदत केली. माण तालुक्यातील धूळदेव येथे दुपारी ही घटना घडली. सदर बसमधून ४४ प्रवाशी प्रवास करीत होते परंतु बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांचा जीव बचावला आहे. धूळदेव गावाच्या थांब्यावर बस थांबली असता एक वृद्ध प्रवाशी खाली उतरत असताना बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे बस चालक शंकर पवार यांच्या लक्षात आले. प्रसंगाचे गांभीर्य पाहून चालक पवार यांनी बसमधील ४४ प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी खाली उतरताच आगीने अधिकच रौद्र स्वरूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीने वेढली गेली. हा थरारक प्रसंग पाहून प्रवासी घाबरून गेले होते आणि चालकाला धन्यवाद देत होते.
बसला आग लागताच तातडीने म्हसवड पोलिसांना देण्यात आली. म्हसवड पोलिसांनी नगरपालिकेच्या यंत्रणेला खबर दिली आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणाही तातडीने पोहोचली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जीवितहानी झाली नाही पण एस टी जाळून खाक झाली आहे. एस टी चा केवळ सांगाडा उरलेला दिसत आहे. बस थांबली असताना हा प्रकार लक्षात आला त्यामुळे मोठे संकट टळले आणि ४४ प्रवाशांचा जीव वाचला आहे. धावती बस पेटली असती तर मोठा अनर्थ झाला असता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !