BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

वीज ग्राहकांसाठी महावितरणची नवी योजना जाहीर !

 



बुलढाणा : वीज ग्राहकांसाठी महावितरणने आता आणखी एक नवी योजना आणली असून 'विलासराव देशमुख अभय योजना' असे या योजनेचे नाव असून आज त्यांनी लोणार येथे पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली आहे. 


वीज बिलाच्या वसुलीसाठी गेल्या काही महिन्यांपासून महावितरण विविध उपाय योजना करीत आहे. वीज बिल थकलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा तोंडाला जात आहे आणि महावितरण कोट्यवधी थकीत बिलांच्या वसुलीसाठी ग्राहकांच्या दारापर्यंत जात आहे परंतु अपेक्षित वसुली होताना दिसत नाही. प्रचंड वीज बिल थकल्यामुळे महावितरण अडचणीत आले असल्याने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. आता महावितरणने 'विलासराव देशमुख अभय योजना' सुरु केली असून त्याची घोषणा आज करण्यात आली आहे. कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांसाठी ही योजना असून असे लाखो ग्राहक आहेत.  


सदर योजनेमुळे कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीज जोडण्या पुन्हा सुरु होतील आणि कायमस्वरूपी बंद झालेली वीज कनेक्शन पूर्ववत होतील अशी अपेक्षा आहे. आजपासून म्हणजे १ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२२ एवढ्याच कालावधीसाठी ही योजना आहे.  कृषी ग्राहक वगळून अन्य सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी ही योजना असून थकबाकीदार असलेल्या ग्राहकांनी बिलांची मूळ रक्कम एकरकमी भरली तर व्याज आणि विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. मूळ थकबाकीत सवलत देण्यात येणार असून मुद्दल रक्कम एकरकमी जमा केल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के आणि लघुदाब ग्राहकांना १० टक्के जादाची सवलत थकित मुद्दल रकमेत दिली जाणार आहे.  


थकीत रक्कम सुलभ हप्त्याने रक्कम भरण्याची ग्राहकांची इच्छा असल्यास मुद्दल रकमेच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरली जाणे आवश्यक आहे. अशी रक्कम भरली तरच उरलेली रक्कम सहा हप्त्यात भरता येईल. हप्त्याने रक्कम भरायची असेल तर वीज पुरवठा सुरु केल्यानंतर चालू बिलाच्या रकमेसोबत ठरलेली हप्त्याची रक्कम भरावी लागणार आहे. उर्वरित हप्त्यांची रक्कम भरली गेली नाही तर मात्र माफ केलेले व्याज आणि विलंब आकार याची संपूर्ण रक्कम पूर्ववत लागू होणार आहे. वीज ग्राहकांनी या नव्या योजनेचा लाभ घेत आपले बंद पडलेले वीज कनेक्शन पूर्ववत सुरु करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !