सोलापूर : अक्कलकोट मार्गावर कुंभारी टोळ नाक्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात तीन लहान मुलासह आठ जण जखमी झाले असून या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
अलीकडे अपघात आणि प्राण हे सामान्य बनून चालले आहे. रोज विविध मार्गावर अनेक अपघात होतच आहेत. माणसांचे प्राण जात आहेत तरीही वाहनचालक काळजीपूर्वक वाहने चालवायला तयार नाहीत. कालच वर्धा येथे भीषण अपघात होऊन वैद्यकीय शिक्षण घेणारे सात विद्यार्थी जागीच ठार झाले. मध्यरात्री प्रचंड वेगाने जात असलेली त्यांची गाडी पुलावरून चाळीस फुट खोल नदीत कोसळली. या वाहनाची नंतर तपासणी केली असता गती दाखविणारे मीटर १६० वर लॉक झाले असल्याचे आढळले. तत्पूर्वी त्यांनी ब्रेक लावल्याच्या खुणाही रस्त्यावर दिसून आल्या. त्यामुळे त्याआधी ही गाडी नक्की किती वेगाने धावत असेल याचा अंदाज येतो.
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर - अक्कलकोट मार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी नाक्याजवळ अत्यंत विचित्र अपघात झाला. दोन ट्रक एकमेकांना धडकल्या आणि त्यातच सात सीटर कार जाऊन धडकली आणि अपघाताची भीषणता अधिका वाढली. अत्यंत वेगात असलेली कार ट्रकवर जाऊन आदळल्याने कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ही गाडी एका ढिगाच्या स्वरुपात दिसू लागली आहे. या गाडीकडे पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता सहज लक्षात येते.
अपघातग्रस्त कार पाहिल्यानंतर या कारमधील कुणीही वाचले नसतील असा अंदाज येतो परंतु सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. तीन लहान मुलांसह एकूण आठ जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथील सचिन सुरेंद्र खटके, सपना सचिन खटके, परमेश्वर शिवाजी सोनटक्के, पल्लवी गिरीश तिवारी आणि तीन लहान मुले हे सहा जण आणि ट्रकचा चालक गणेशन असे आठ जण जखमी झाले आहेत. कारचा एवढा चक्काचूर झाला आहे की आतील जखमींना बाहेर काढणेही अशक्य बनले होते. क्रेनची मदत घेवूनच जखमींना बाहेर काढावे लागले. जवळपास सर्वच जखमी गंभीर अवस्थेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !