BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मे, २०२३

मान्सून अंदमानात दाखल, आता महाराष्ट्रात येण्याची प्रतीक्षा !


शोध न्यूज : यंदा पाऊसमान कसे राहील याची चिंता व्यक्त होत असतानाच मान्सून अंदमानात येवून पोहोचला असून आता महाराष्ट्रात कधी येतोय याची प्रतीक्षा असणार आहे. 


मागील वर्षी मुबलक पाऊस झाला परंतु यावर्षी येणारे हवामान अंदाज सतत चिंता वाढविणारे ठरले आहेत. अल निनोचा प्रभाव राहणार असल्यामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी मोसमी पाऊस कधी येणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आज मात्र समाधानाची बातमी आली असून यंदाचा मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे,  अंदमान-निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) आगमन झाले आहे. त्यामुळे अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. यावर्षी मान्सून तीन दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे.


दरवर्षी मान्सून  २२ मे रोजी अंदमानात येत असतो. तेथून पुढे तो केरळकडे सरकत असतो आणि नंतर महाराष्ट्राकडे त्याची वाटचाल सुरु होत असते. भारतात एल निनोची स्थिती कमकुवत झाल्याचे हवामान खात्याने गेल्या महिन्यात सांगितले होते. त्यात आणखी प्रगती होण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीत मान्सूनमध्ये देशात ९६ टक्के पाऊस पडू शकतो. अंदमानात मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असली ,तरी मान्सूनचा पुढील प्रवास सुरळीत राहिल्यास लवकरच केरळ आणि पुढे गोवा, महाराष्ट्रातही दाखल होऊ शकतो.


यावर्षी मान्सून केरळमध्ये येण्यास तीन दिवसांचा उशीर होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. केरळ येथे मान्सून पोहोचण्याची तारीख १ जून असते. येत्या ३ ते ४ दिवसांत दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.  दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह आणि पावसाच्या हजेरीने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 


यावर्षी ९६ टक्के पाउस होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यात पाच टक्के इकडे तिकडे होऊ शकते. महाराष्ट्रात पाऊस कधी येईल याचीही विचारणा आता होत असून हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी खाजगी संस्था 'स्कायमेट' ने मात्र ९ ते १५ जून ही तारीख दिली आहे. या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात येईल असे या संस्थेने म्हटले आहे. स्कायमेटने ही तारीख जाहीर केली असली तरी भारतीय हवामान विभागाने मात्र वेगळेच मत व्यक्त केले आहे.


यावर्षी मान्सून तीन दिवस उशिराने येईल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. त्यानुसार केरळमध्ये १ जून रोजी पोहोचणारा मान्सून यावर्षी ४ जून रोजी दाखल होणार आहे. त्यानंतर तो पुढील वाटचाल करील आणि महाराष्ट्राकडे सरकेल. परंतु शेतकऱ्यांनी याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. असा दिलासा दिला जात आहे परंतु एल निनोचा प्रभाव दिसून येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या प्रभावामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असते. देशभरात अल निनो कमकुवत झाला असल्याचे मागील महिन्यात हवामान विभागाने सांगितले असून त्यात अधिक प्रगती होण्याची शक्यता एकदम कमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशात यावर्षी ९६ टक्के पावसाची शक्यता असून, पावसाबाबतचा पुढील अंदाज जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल असे देखील सांगितले गेले आहे. त्यामुळे या अंदाजानंतरच पावसाची परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.


राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात मोठी वाढ झाली असून सोलापूर, जळगाव येथे ४३ अंश सेल्सियस पर्यंत पार चढलेला आहे. कडक उन्हाळ्याने लोक हैराण झाले असून उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. उकाड्याने देखील लोक हैराण झालेले आहेत. यामुळे तर पावसाची अधिक प्रतीक्षा होऊ लागली आहे. (Monsoon has arrived in Andaman, waiting to reach Maharashtra)राज्यात पावसाचे आगमन होण्यास आणखी काही दिवस शिल्लक असले तरी, आज मात्र अंदमानात तो दाखल झाला असल्याचे सध्या तरी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !