BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मे, २०२३

अठरा दिवसांच्या बाळाची तीन लाखाला विक्री !

 


शोध न्यूज : अवघ्या अठरा दिवसांच्या बाळाला तीन लाखात विकल्याची मोठी घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली असून या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात सोलापूर सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


बाजारात अनेक गोष्टी विकत मिळतात, ज्यांच्याकडे पैसा आहे ते काहीही खरेदी करू शकतात पण अलीकडे माणसांची देखील खरेदी विक्री होत असल्याचे महाराष्ट्रातही आढळून येवू लागले आहे. नवजात बालके पळवली जातातच पण नवजात मुलांची देखील विक्री होते. अशा अनेक घटना या आधीही समोर आलेल्या आहेतच. आता सोलापूर येथेही अशीच एक निर्दयी घटना उघडकीस आली आहे. तीन मुलानंतर चौथा मुलगा  झालेल्या एका मातेकडून नर्सिंग होम मधील महिलेने बारीक सारीक माहिती मिळवली. (A shocking eighteen-day-old baby sold for three lakhs) बाळाला मेंदूचा आजार असल्याचे सांगून उपचार करण्यासाठी मोठा खर्च येईल अशी बतावणी देखील या महिलेने केली आणि बाळ सांभाळायला देण्याचे नाटक केले. त्यानंतर मात्र जे घडले ते अत्यंत धक्कादायक होते. 


तीन महिलांनी अवघ्या तीन लाख रुपयांना हेच बाळ विकून टाकले आणि आलेले पैसे तिघींनी मिळून वाटून घेतले. या बाळाच्या आईला मात्र एक पैसाही दिला नाही. वास्तविक, आपल्या परिचयाच्या डॉक्टरकडून बाळावर उपचार करण्याचा बहाणा त्या महिलेने केला होता. त्यासाठी मातेकडून हे बाळ घेतले आणि परस्पर बाळाची विक्री देखील करून टाकली. माझ्या बाळाला कुठल्या दवाखान्यात दाखल केले आहे ? अशी चौकशी मातेने केल्यावर, या महिलांच्याकडे नेमके उत्तर नव्हते. अखेर त्यांनी या मातेला काही पैसे देण्याचे आमिष दाखवले. बाळाच्या विरहाने आई व्याकूळ झाली होती,  तिला आपले चिमुकले बाळ पहायचे होते. परंतु सदर तीन महिलांची तर बाळाची विक्री करून तीन लाख रुपये घेतले होते आणि त्याची वाटणीही केलेली होती. बाळही नाही आणि पैसेही मिळाले नाहीत त्यामुळे  मातेने टाहो फोडत सदर बाजार पोलीस ठाणे गाठले. 


बाळासाठी आकांत करणाऱ्या महिलेची कहाणी ऐकून सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रफिक इनामदार यांनी 'त्या' मध्यस्थी महिलेचा शोध सुरु केला. पोलीस अंमलदार थेट त्या मध्यस्थी महिलेच्या घरी गेले. त्यांनी बारकाईने या घटनेतील माहिती काढली तेंव्हा त्यानाही धक्का बसला. टप्प्याटप्प्याने चार महिलांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून आले. तीन लाखांची वाटणी कशी झाली याचीही माहिती समोर आली. पहिल्या महिलेने ८० हजार रुपये घेतले होते तर दुसऱ्या महिलेने यातील २० हजार रुपये घेतले होते. मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेने दोन लाख रुपये घेतले होते. यातील मुख्य आरोपी असलेल्या महिलेने या आधीही असाच प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. दरम्यान यातील पन्नास हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले असून बाकीची रक्कम अद्याप मिळाली नाही. बॉंड करूनही पैसे मिळाले नाहीत आणि बाळही नाही त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले अन्यथा सगळेच दडपले गेले असते. सदर बाजार पोलिसांनी बारकाईने तपास करीत बाळाच्या आई वडिलांसह मध्यस्थी महिला आणि बाल विकत घेणारे अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मेंदूच्या आजाराची भीती दाखवून आणि उपचार न झाल्यास बाळाच्या जीवाला धोका आहे अशी बतावणी करून हा प्रकार मध्यस्थी महिलेने केला. मध्यस्थी महिलेने या बाळाला विकण्याचा कट रचला आणि तिने गरजू महिला गाठली. एका मातेला दोन मुळीच होत्या, तिची माहिती काढून तिला हे बाळ विकले होते. दोन्ही मुलीच असल्याने आपल्याला एक मुलगा मिळेल या आशेने त्या मातेने आपल्या आईचे दागिने मोडले आणि तीन लाख रुपयांची जुळवाजुळव केली आणि या महिलांच्या हाती रक्कम सोपवली. प्रत्यक्षात या बालकाला कसलाही मेंदूचा आजार नाही परंतु महिलेने बाळ द्यावे म्हणून तिला तसे भासविण्यात आले. पोलिसांनी तपास सुरु केला असतानाही मध्यस्थी महिला पोलिसांना खोटे बोलत राहिली. तिने सदर बाळाला हैदराबाद येथे विकल्याचे सांगितले. पोलिसांनी मात्र सायबर माध्यमातून तपास सुरु केला असता, सदर बाळ सोलापुरातच विकले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सोलापूरचे लोकेशन मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन बाळ ताब्यात घेतले आणि न्यायालयाचे आदेशाने सदर बाळ मातेच्या स्वाधिन केले.  सदर बाजार पोलिसांनी आता पुढील अधिक तपास सुरु केला आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !