BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मे, २०२३

वाळूच्या लफड्यात तहसीलदार गेला तुरुंगात !



शोध न्यूज : वाळू तस्करीत मिंधे असलेले अनेक महसूल कर्मचारी अधिकारी यांना तुरुंगाची हवा खावी लागलेली असताना आता पुन्हा एक तहसीलदार वाळूतील लाच प्रकरणात तुरुंगात जाऊन बसला आहे. 


जिकडे तिकडे वाळू चोरांचा धुमाकूळ चालला असून काही केल्या वाळू तस्करी थांबत नाही, त्यासाठी तर शासनाने वाळूचे नवे धोरण आणले आहे पण वाळू तस्कर वेगवेगळ्या प्रकाराने खेळ्या करू लागले असल्याने, अजून या नव्या धोरणाला गती आली नाही. या वाळू तस्करांचा बिमोड करून महिन्याभरात वाळू वितरण सुरळीत करण्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालच दिले असून 'आमचेच तहसीलदार वाळूचे हप्ते घेत आहेत, आम्हालाच लाज वाटू लागली आहे' असेही त्यांनी सांगितले आहे. महसूल विभागातील काही कर्मचारी आणि अधिकारीच हप्तेखोरी करीत वाळू तस्करीला प्रोत्साहन देतात हे आता काही लपून राहिले नाही. सामान्य नागरिकांना देखील ही साखळी माहित झालेली आहे, शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दणका दिल्यानंतर यांचे मुखवटे ओरबाडले जात आहेत आणि त्यातून ही मिलीभगत उघडी पडत आहे.   


नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत वादग्रस्त असलेले तहसीलदार विजय बोरुडे यांनी आपल्या हस्तकाच्या मदतीने वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करण्याकरिता वीस हजार रुपयांची रक्कम घेताना मोठी कारवाई एसीबी कडून करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघे अडकले असून जिल्हा सत्र न्यायालयाने या दोघानाही दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी ठरलेल्या रकमेपैकी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा हस्तक, गुरमित सिंग दडीयल यांनी आरोपी तहसीलदार विजय बोरुडे यांच्यासाठी स्वीकारण्याचे मान्य केले होते. (Sand smuggling, Tehsildar in jail in bribery case)सदर रक्कम घेताना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. वाळूतील लाच प्रकरणी तहसीलदारच अडकल्याने महसूल विभागात मोठी खळबळ तर उडालीच आहे पण, सामान्य नागरिकात देखील हा चर्चेचा विषय बनला आहे. दंडाधिकारी असलेल्या तहसीलदाराना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. 


वाळू चोरी का थांबत  नाही ? असा सवाल नेहमीच विचारला जातो. पोलीस आणि महसूल विभाग वाळू चोरांच्या विरोधात कारवाया करतात, बोटी फोडतात, गुन्हे दाखल करतात, काही वेळा तर या वाळू चोरांच्या टोळ्यांना हद्दपार देखील करतात. याच्या बातम्या प्रसिद्ध होतात पण वाळू चोरी थांबली आहे अशी बातमी कधीच समोर येत नाही. वाळू चोरांवर होत असलेली कारवाया हा केवळ एक फार्स असतो अशी भावना अनेकांची होत आहे, त्यातच महसूल विभागाचे अधिकारी, वाळू प्रकरणी लाच घेताना पकडले जातात त्यामुळे, जनतेच्या मनात असलेल्या विषयावर शिक्कामोर्तब होत असते. आता तर थेट तहसीलदारच वाळूच्या प्रकरणात तुरुंगात गेला आहे त्यामुळे, वाळू चोऱ्या का थांबत नाहीत ? त्यांना कुणाचे अभय असते याचेच उत्तर मिळून गेले आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !