BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मे, २०२३

सहकार शिरोमणी निवडणूक,! उमेदवारांचा अंतिम फैसला सोमवारी होणार !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हरकतींचे रणकंदन रात्री उशिरापर्यंत सुरूच रहिले असून प्रमुख उमेदवारांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. आता अंतिम अर्जांची यादी सोमवारीच जाहीर केली जाणार आहे. 


पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणकंदन अधिकच संघर्षाच्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. या वेळच्या निवडणुकीत विरोधाची तीव्रता अधिक असून विठ्ठल परिवार विस्कळीत झाला आहे. अनेक कारखाने ताब्यात असतानाही विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी हा कारखानाही आपल्याच ताब्यात यावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत तर दीपक पवार हे नेहमीच चेअरमन कल्याणराव काळे यांच्या विरोधात दंड थोपटून असतात, त्यामुळे निवडणुकीत ते मागे राहण्याची शक्यताच नाही. २१ जागांसाठी २४२ जणांचे तब्बल २६८ उमेदवारी अर्ज दाखल झालेले असताना छाननीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. यावेळी  मात्र हरकतींचा पाउस पाडण्यात आला असून रात्री उशिरा पर्यंत काही हरकती अनिर्णीत राहिल्या आहेत. त्यामुळे कारखाना निवडणुकीत अंतिमरित्या किती अर्ज बाद ठरले आणि किती वैध ठरले याची स्पष्ट आकडेवारी येऊ शकली नाही.


सहकार शिरोमणी' ची निवडणूक यावेळी भलतीच गाजत असून अभिजित पाटील आणि दीपक पवार यांनी दंड थोपटले असल्यामुळे ही निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. संधी मिळेल तेथे परस्परांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न होत असून, राजकीय बुद्धिबळ नेटाने खेळले जात असल्याचे दिसत आहे. त्याचे प्रतिबिब पुन्हा अर्ज छाननी प्रक्रियेत देखील दिसून आले आहेत. आधी दाखले देण्यावरून रणकंदन झाले आणि आता छाननीत प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अर्ज कसे अवैध ठरतील यासाठी जोर लावला जात आहे. उपविधी प्रमाणे प्रत्येक २० गुंठे क्षेत्राला कारखान्याचा एक भाग (शेअर) असे विभाजन करण्यात येत असल्याचे आणि त्याप्रमाणे एकेका उमेदवारांचे अनेक भाग होत असल्याचे हरकतीवरून समोर आले. अशा भागांच्या प्रमाणात भागभांडवलासह लगतच्या ५ पैकी किमान ३ वर्षे ऊस पुरवठाही केलेला असणेही उमेदवारी अर्जाच्या वैधतेसाटी आवश्‍यक असल्याचे नमूद करण्यात आले. याच कळीच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत तिन्ही गटांमध्ये रणकदन सुरू होते. त्यावरच अनेकांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने उमेदवारांसह समर्थक सभासदांमधून तीव्र संताप व्यक्‍त करण्यात येत होता. 


सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारी  अर्जावर हरकतींचा  पाऊस पाडण्यात आला. परस्परांच्या अर्जावर तीनही गटाकडून जोरदार हरकती घेण्यात आल्या आहेत, यामुळे छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, प्रा. बी पी रोंगे यांच्यासह प्रमुख उमेदवारांच्या अर्जावर आलेल्या हरकतीबाबत निर्णय राखून ठेवले आहेत. आता सोमवारीच यावर अंतिम फैसला येणार आहे.
 


छाननी होऊन नेमके चित्र समोर येण्याची अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात तसे घडले नाही,  सुरूवातीपासूनच प्रत्येक मतदारसंघ व गावनिहाय अर्जावर हरकतींचा पाऊस पडण्यास सुरूवात झाली. वकिलांची फौज उभी करून जोरदार हरकती घेण्यात येत राहिल्या आणि यातून कारखान्याचे  चेअरमन कल्याणराव काळे हे देखील सुटले नाहीत, संस्था मतदारसंघातील कल्याणराव काळे यांच्या अर्जावर धनंजय काळे यांनी हरकत घेतली. कल्याणराव काळे हे निशिगंधा बँकेचेही चेअरमन असून एकाचवेळी दोन सहकारी संस्थांचे संचालक चेअरमन होता येणार नाही. तसेच त्यांनी भागाच्या प्रमाणात ऊस पुरवठा केला नाही, अशा प्रकारची ही हरकत होती. यावर दोन्ही बाजुंच्या वकिलांनी युक्तीवाद केले. अखेरीस कल्याणराव काळे यांनी बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याची कागदपत्रे दाखल करण्यात आली. काळे यांनी ही कागदपत्र सदर केली तरीही विरोधी गट हरकतीवर ठाम राहिल्याने निर्णय राखून ठेवण्यात आला. 


विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील गटाचे प्रमुख उमेदवार प्रा.डॉ. बी.पी. रोंगे यांच्या अर्जावर काळे गटाने तीव्र आक्षेप घेतले. रोंगे यांच्या नावातच चूक असल्याचा मुद्दा लावून  धरण्यात आला. तसेच भागाची रक्कम जवळपास ३८ हजार रूपये त्यांच्याकडे  येणे असल्याचे नमूद करण्यात आले.  यावर पाटील गटाने सडेतोड युक्तीवाद  करताना, कारखानाच पैसे भरून ' घेत नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर ' पत्रव्यवहार केल्याचे दाखवून देण्यात आले. 


सुमारे दीड तास दोन्हीकडून युक्तीवाद सुरू राहिल्याने उपस्थित उमेदवार, कार्यकर्तेही त्रस्त  झाले. त्यातूनच गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने निर्णय राखून  ठेवल्याचे जाहीर करून, काही वेळ ही कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थांबविली.  (Sahakar Shiromani Vasantrao Kale Sugar Factory Election, Scrutiny objections) संस्था, महिला प्रतिनिधी तसेच राखीव प्रवर्गातील सर्व हरकतींवर सुनावणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सरकोली व कासेगांव ऊस उत्पादक गटातील उमेदवारी अर्जांची सुनावणी घेण्यात आली. गादेगांव, भंडीशेगांव व भाळवणी या ३ गटांची सुनावणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी अंतिम चित्र स्पष्ट होईलच परंतु या निर्णयावर समाधानी नसलेले उमेदवार पुन्हा अपिलात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 





'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !