BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मे, २०२३

अटकेच्या भीतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी झाले पसार !



शोध न्यूज : आरोपींच्या अटकेसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस आता आपल्यावर अटकेची वेळ येताच पसार झाले असल्याची एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक माहिती समोर येत आहे. सोलापूर येथील दोन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे सात जण पसार झाले असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील, भांबुरे वस्ती, पारधी वस्ती येथील भीमा रज्जा काळे याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी तपास सीआयडी कडे गेलेला आहे. संशयित आरोपी भीमा रज्जा काळे याला अटक केल्यानंतर  पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं होतं.  पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी आरोपीला सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात  दाखल करण्यात आलं मात्र त्याचा दि. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी मृत्यू झाला. विजापूर नाका पोलिस स्टेशनच्या  कोठडीत त्याला मारहाण झाली होती. मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी दोन अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीआयडीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक श्रीशैल्य सिद्रामप्पा गजा  यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत आहे. 


दरम्यान सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अटक करण्यासाठी सोलापुरात आले असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलीस अंमलदार हे पसार झाले आहेत. पोलीसांची चाहूल लागताच सामान्य गुन्हेगार पळून जातो आणि पोलिसांच्या हाती लागणार नाही याची दक्षता घेत असतो. असाच काहीसा प्रकार आता पोलिसांच्या बाबतीत झाला असल्याचे दिसत आहे. सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याची बातमी समजताच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी पसार झाले आहेत. तरीही या पथकाने त्यांची शोध मोहीम तीव्र केली असून या पथकाने सोलापूर येथेच तळ ठोकला आहे. हे पथक संबंधिताचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच दिली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अटकेच्या भीतीने पसार झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले फोन देखील बंद ठेवले आहेत.


पोलिसांच्या भीतीने सामान्य गुन्हेगार पळून जातात, आपल्याला अटक होऊ नये यासाठी धावपळ करीत असतात आणि पोलीस त्यांचा पाठपुरावा करीत असतात. आता मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हेच अटकेपासून दूर पळत असल्याचे दिसत आहे. डेथ इन कस्टडी चे हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेचे ठरलेले आहे. (Fearing arrest, the police along with the officers dispersed) त्यामुळे आता सीआयडीच्या पथकाला हे पोलीस कधी सापडतात याकडेच लक्ष लागलेले आहे. या पथकाने मात्र सोलापुरातच ठिय्या मारला आहे. या सर्व प्रकरणामुळे पोलीस दलात मात्र मोठी खळबळ उडाल्याचे दिसत आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !