शोध न्यूज : एका बालकाला निर्जन रस्त्यावर सोडून देवून पालक फरार झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पंढरपूर तालुक्यात समोर आली असून पोलीस आता त्या पालकांचा शोध घेत आहेत.
आपल्या लहान मुलांवर आई वडील जीवापाड प्रेम करीत असतात, कुठलीही आई आपल्या पोटाच्या गोळ्याला पापण्यांच्या सावलीत जपत असते. असे असले तरी अनेक नवजात बालकांना फेकून दिल्याचा घटना घडतात. एकीकडे लहान मुलांना फेकले जाते तर दुसरीकडे पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात अनेक वृद्धाना, मनोरुग्णाना सोडून नातेवाईक पसार होत असतात. आपल्याच रक्ताच्या नात्याच्या माणसाना असे बेसहारा करून सोडून जाण्यात त्यांच्या मनाला वेदनाही होत नाहीत. पंढरपूर शहर आणि चंद्रभागेच्या वाळवंटात आजवर कित्येक वृद्ध आणि मनोरुग्ण सोडून देण्यात आले आहेत. त्यांचे मागे काय होते हे देखील पुन्हा पाहिले जात नाही, लहान मुलांना सोडून देण्याच्या घटना मात्र सहसा आढळून येत नाहीत. पंढरपूर तालुक्यातील होळे - खेड भोसे रस्त्यावर मात्र असा एक धक्कादायक प्रकार आढळून आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील होळे - खेड भोसे रस्त्यावर एक दोन अडीच वर्षांचे वय असलेले एक बालक असहाय्य अवस्थेत आढळून आले आहे. फारशी रहदारी नसलेल्या या रस्त्यावर एवढेसे बालक सोडून पालक फरार झाले आहेत. फुलासारखे कोमल असणारे बालक अशा कडक उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावर सोडून जाताना पालकांना काहीच कसे वाटले नसेल ? या रस्त्यावर फलटणकर यांच्या शेताच्या परिसरात हे बालक आढळून आले. त्याला सोडून पालक पसार झाले असल्याचे दिसत आहे. निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातलेल्या या बालकाची उंची ८० सेमी असून रंग सावळा आहे. करकंब पोलिसांना या मुलांबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन या मुलाला ताब्यात घेतले आहे या मुलांबाबत आणि त्याच्या पालकांबाबत पोलीस शोध घेत असून त्यांनी सोशल मीडियावरून देखील आवाहन केले आहे. सदर बालकासंदर्भात अथवा त्याच्या पालकाबाबत काही माहिती असल्यास करकंब पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करून माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
एवढ्याशा गोंडस बालकाला ऐन उन्हाळ्यात अशा निर्जन रस्त्यावर (The parents absconded leaving the child on a deserted road) सोडून दिल्याची घटना ऐकून मानवी मन हेलावून जात आहे आणि त्या अज्ञात पालकांच्या वर्तनाचा संताप व्यक्त केला आहे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !