BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मे, २०२३

पिण्याच्या पाण्याच्या नळातून आले चक्क जिवंत मासे !


शोध न्यूज : पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेल्या नळातून पाणी येईलच याची खात्री नसते परंतु, नळातून जिवंत मासे मात्र येत असल्याचा एक आगळा वेगळा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी यथील नागरिकांनी घेतला आहे. नळातून मासे येत असल्याची घटना ही चर्चेची ठरली आहे.


पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून घराघरात पाण्याचे नळ पोहोचलेले असतात, अर्थात नळ असले तरी या नळाला पाणी येत नाही, आले तरी ते कमी दाबाचे असते, अशा प्रकारच्या तक्रारी नेहमीच आणि सगळीकडे ऐकायला मिळत असतात. कधी या नळातून गढूळ पाणी येते तर कधी कोंबडीची पिसे आलेली दिसतात. हे कमी होते म्हणून की काय, आता नळातून चक्क मासे येवू लागलेत. अर्थात या माशांचे पैसे आकारले जाणार नाहीत, त्यामुळे नागरिकांना ही एक फुकट भेट मिळाली आहे. एरवी नळाला गाळमिश्रित पाणी येत असते म्हणून कुर्डूवाडी येथील नागरिकांची ओरड आहे, आता मात्र चक्क जिवंत मासेच नळातून आले आहेत. नगरपालिकेने नागरिकांची ही सोय केली आहे की आणखी काही प्रकार आहे, याबाबत मात्र काही समजू शकले नाही. 


माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे, टेंभुर्णी रस्त्यालगत असलेल्या गोल चाळीत काही नागरिकांच्या नळाला पाणी आले आणि या पाण्यासोबत चक्क छोटे जिवंत मासे देखील आल्याची घटना समोर आली.  शहरातील गोल चाळ, नेहरूनगर, बसस्थानकाकडे जाणारा रस्ता या भागात हा प्रकार समोर आला आहे. एकीकडे शुद्ध, स्वच्छ पाणी मिळण्याची मागणी होत असताना, पिवळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी मिळत असल्याच्या आधीच्याच तक्रारी आहेत. (A live fish came from the drinking water tap) यात सुधारणा होण्याऐवजी नळातून जिवंत मासेच यायला लागले, त्यामुळे नागरिकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. 


नळाला पाणी आल्यानंतर सुरुवातीला काळ्या रंगाचे पाणी आले, त्यामुळे नागरिकांनी ते सोडून दिले. नंतर हे पाणी बादलीत घेतले असता, या पाण्यात चक्क जिवंत मासे आढळून आले. छोटे छोटे मासे दिसल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त होऊ लागले आणि उत्सुकतेपोटी शेजारी चौकशी केली असता, त्यांच्या नळातून मासे आल्याचे समजले. आधीच अर्धा तास पाणी येते, त्यात सुरुवातीला काळपट पाणी येत असल्यामुळे पाच ते सात मिनिट हे पाणी घेता येत नाही. आणि आता त्यातही मासे आढळून आल्याने पाणी पुरवठा विभाग नागरी आरोग्याची किती काळजी घेत असेल याचेच उत्तर मिळाले आहे. काही नागरिकांनी संबंधित अधिकारी याना कळविले देखील, पण साधी पाहणी करण्यासाठीही कुणी फिरकले नसल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !