शोध न्यूज : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाच मोबाईल चोरण्याचा 'पराक्रम' एका तरुणाने केला असून याप्रकरणी माढा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मोबाईल चोरण्याच्या घटना काही नव्या नाहीत. मोबाईल चोर संधी मिळेल तेथून मोबाईल लंपास करतातच, एवढेच काय, बोलताना हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचे देखील प्रकार घडत असतात. सामान्य व्यक्तींचे मोबाईल चोरी होणे ही बाब तेवढीच सामान्य झाली आहे पण एका भामट्याने थेट माजी केंद्रीय गृहामंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाच मोबाईल चोरण्याचे मोठे धाडस केले. विशेष म्हणजे या चोराला सुशीलकुमार शिंदे यांची पकडून ठेवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले गेले. सुशीलकुमार शिंदे यांचाच मोबाईल चोरण्याच्या प्रकाराने खळबळ तर उडालीच पण या चोराच्या धडासाचीच अधिक चर्चा होऊ लागली आहे. ज्यांनी देशाचे गृहमंत्रीपद सांभाळले आहे अशा नेत्यांच्या मोबाईलवर डोळा ठेवणारा चोर हाच चर्चेचा विषय बनू लागला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या मुंबईला निघाले होते. सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे रिझर्वेशन त्यांनी केले होते. सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या एच ए १ मधील ए कुपीतील त्यांचे आरक्षण होते. संजय तुकाराम राजेशिर्के आणि विलास कृष्णकांत गावकर या पोलिसांची पीएसओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत रेल्वे पोहोचल्यानंतर दादर रेल्वे स्टेशन येण्याच्या काही वेळ आधीच शिंदे हे उठून बाथरूममध्ये गेले होते. ते बाथरूममधून बाहेर आले तेंव्हा एक तरुण त्यांचा मोबाईल चोरून निघाल्याचे शिंदे यांनीच पहिले. बाथरूममध्ये जाताना शिंदे यांनी आपला मोबाईल सीटवर ठेवलेला होता. तो उचलून एक तरुण तेथून सटकण्याचा प्रयत्न करीत असतानाच शिंदे बाहेर आले आणि तो पकडला गेला.
सदर मोबाईल चोराला सुशीलकुमार शिंदे यांनीच पकडून ठेवले. पीएसओ असलेल्या पोलिसांना बोलावून त्यांनी या मोबाईल चोराला पोलिसांच्या हवाली केले. (Sushilkumar Shinde's mobile stolen during train journey) हा २३ वर्षे वयाचा तरुण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील घाटणे या गावचा असून मंदार प्रमोद गुरव असे या संशयिताचे नाव आहे. हा मंदार गुरव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा मुलगा असून त्याचे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंदार गुरव याच्याविरोधात दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !