BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑक्टो, २०२२

सीना नदीच्या पुरामुळे सहा बंधारे पाण्याखाली, सतर्कतेचा इशारा !

 



शोध न्यूज : उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली असतानाच सीना नदीलाही पूर आला असून मोहोळ तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली बुडाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


मान्सून परतण्याच्या वेळेला पावसाने राज्यातील विविध भागांना जोरदार दणका दिला आहे. नुकतेच माढा, करमाळा तालुक्याला झोडपून काढले आणि प्रचंड नुकसान केले. त्यानंतरही राज्याच्या अनेक भागात पावसाने धिंगाणा घातला असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यावर्षी चांगला पाऊस झालेला असल्याने धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. पावसाळा संपत आलेला असतानाच पुन्हा पावसाचे जोरदार आगमन होऊ लागल्यामुळे धरणातून पाणी सोडणे क्रमप्राप्त आहे. उजनी धरणातून काल मंगळवारी ५० हजार कुसेक्स पाणी सोडले असून यामुळे भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वहात आहे. भीमा काठच्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


उजनी धरणातून पावसाळ्यात सतत पाणी सोडले गेल्याने भीमा सतत प्रवाहित राहिली परंतु आता सीना नदीला देखील पूर आलेला आहे. सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडण्यात आले असल्यामुळे सीना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सीना - कोळेगाव धरण शंभर टक्के भरले असल्याने आणि पावसात वाढ झाल्यामुळे काल रात्रीच ३० हजार क्युसेक्सने पाणी सोडणे सुरु झाले होते. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मोहोळ तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर दोन बंधारे बुडण्याच्या स्थितीत आले आहेत. आणखी तीन फुट पाणी पातळी वाढल्यास उर्वरित दोन बंधारेही पाण्याखाली जाणार आहेत.  


मागील आठवड्यापासून सीना कोळेगाव धरण परिसरात सतत पाऊस पडत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे धरणातून पाणी सोडणे आवश्यक बनले आहे. सीना नदीत पाणी सोडले गेल्याने बोपले, अनगर, मलिकपेठ, कोळेगाव, शिरापूर, मुंडेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर विरवडे आणि शिंगोली बंधारेही पाण्याखाली जाण्याच्या परिस्थितीत आहेत. (Six dams under water due to flooding of Sina river) नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी तसेच जनावरांसह सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुरामुळे काही रस्ते बंद झाल्याने पुराचे पाणी कमी होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर काण्यात यावा असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !