BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑक्टो, २०२२

बोअरवेलमधून पाण्याऐवजी चक्क दारूची धार !



शोध न्यूज : बोअरवेल म्हटले की तिच्यातून येणारे पाणी आपल्या डोळ्यापुढे उभे राहते, पण अशी एक बोअरवेल समोर आली आहे की तिच्यातून पाणी येण्याऐवजी चक्क हातभट्टीची दारू येऊ लागली आहे. 


पिण्याच्या पाण्यासाठी अथवा शेतीसाठीही बोअरवेल घेतली जाते आणि मोटार टाकून तिच्यातून पाणी उपसण्यात येते. अनेक ठिकाणी बोअरवेलला पंप बसविले जातात आणि त्याद्वारे पाणी उपसले जाते. जमिनीतील पाणी पातळीवर बोअरवेलचे पाणी अवलंबून असते त्यामुळे कित्येकदा बोअरला पाणी देखील लागत नाही आणि पाण्यासाठी सगळा खर्च पाण्यात जातो. बोअरला पाणी लागो अथवा न लागो पण मध्य प्रदेशातील एका बोअरवेलमधून चक्क हातभट्टीची दारू येत असल्याचा नवाच प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी देखील पंप चालवून पहिला असून या पंपाच्या पाईपमधून थेट दारू बाहेर येताना दिसली आणि पोलीस देखील पहात राहिले आहेत.


अवैध दारूवर पोलीस कारवाई करतात त्यामुळे अवैध व्यावसायिक वेगवेगळ्या युक्त्या करतात आणि पोलिसांना अवैध दारू सापडणार नाही याची दक्षता घेतात. असा प्रकार सगळीकडेच चालतो आणि पोलीस हातभट्टी शोधून काढून साहित्यासह नष्ट करतात. शक्य अशा सगळ्या ठिकाणी ती लपवून ठेवली जाते आणि ग्राहकांना मात्र विकली जाते. गुन्हा जिल्ह्यातील एका पट्ठ्याने अशी काही युक्ती शोधली की पोलिसांनी ती शोधून काढली असली तरी आश्चर्य मात्र व्यक्त होत राहिले आहे. अवैध दारू विक्रेत्याची ही युक्ती पाहून पोलिसांनी देखील कपाळावर हात मारला आहे. 


गुना जिल्ह्यात अवैध दारूची विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्रीशीर माहिती असल्यामुळे पोलिसांनी लगेच त्या गावाकडे आपला मोर्चा वळवला आणि मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला. इकडे तिकडे अशा सर्व शक्य त्या ठिकाणाकडे पोलिसांनी शोधाशोध केली पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आपल्याला मिळालेली माहिती ही चुकीची असल्याची त्यांची खात्री होऊ लागली आणि तेवढ्यात एका पोलिसाची नजर जवळच असलेल्या एका बोअरवेलकडे गेली. बोअरवेल पाहून शंका येण्याचे काहीच कारण नाही पण तरीही एका पोलिसाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 


पोलिसाने जाऊन बोअरवेलची पाहणी  केली आणि पंप चालवून पहिला. यावेळी पाण्याऐवजी चक्क हातभट्टीची दारूच बाहेर येवू लागली आणि पोलीस पहातच राहिले. तेथे एक ड्रम देखील ठेवलेला होता.  दारू विक्रेत्याने अशी काही युक्ती केली होती की दारूच्या टाक्या असूनही त्या कुणाला दिसत नव्हत्या.  दारूच्या टाक्या काही अंतरावर जमिनीत ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यातून पाईपद्वारे दारू काढली जात होती. दारूच्या टाकीला बोअरवेल हातपंप जोडलेला होता. त्यातून ही दारू काढत प्लास्टिक पिशव्यातून भरली जात होती. या पिशव्या ग्राहकांना विकल्या जात होत्या. 


हा सर्व प्रकार पाहून पोलीस आश्चर्यचकित झालेच पण अनेक पोलीस हा प्रकार पाहून हसत होते. पोलिसांपासून लपविण्यासाठी लोक काय काय करतात याचा अफलातून नमुना समोर आला होता. जंगलाचा परिसर हेरून हे सगळे प्रकार करण्यात आले होते पण पोलसांनी त्यांचे पितळ उघडे पाडले. ( Illegal liquor started coming from borewell, police surprised) दरम्यान पोलीस कारवाईसाठी या परिसरात आल्याचे पाहताच संबंधित लोकांनी तेथून पळ काढलेला होता. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !