BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑक्टो, २०२२

खाजगी प्रवासी बसला पुन्हा एकदा आग !

 


शोध न्यूज : नाशिक येथील बस दुर्घटना ताजीच असताना आज पुन्हा प्रवाशांना घेवून जाणारी बस पेटली आणि प्रवाशांचे जीव धोक्यात आल्याची मोठी घटना समोर आली आहे. 


नाशिक येथे अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतला आणि या आगीने रौद्र रूप धारण केले. पहाटेच्या वेळेस हा अपघात आणि आगीची घटना घडली आणि बसमधील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला असतानाच आज भीमाशंकरला प्रवासी घेवून निघालेली बस पेटली आणि काही क्षणात ही बस पूर्णपणे जळून गेली. आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावत राहिले आणि भर रस्त्यावर बर्निंग बसचा थरार लोकांनी पुन्हा एकदा अनुभवला आहे. प्रवाशांच्या वाहनांना अशा प्रकारच्या आगी लागण्याच्या घटना वाढू लागल्या असल्यामुळे हा एक नवाच चिंतेचा विषय बनला आहे. 


कल्याण येथून २९ प्रवाशांना घेवून ही बस भीमाशंकरला निघालेली असताच मंचर - भीमाशंकर मार्गावर घोडेगावजवळ शिंदेवाडी येथे ही घटना घडली. बसने अचानक पेट घेतला आणि पेटलेली ही बस काही क्षणात आगीच्या स्वाधीन झाली. ही खाजगी बस पेटली तेंव्हा बसमध्ये २९ प्रवाशी होते परंतु आग लागताच या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सदर बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. (Private passenger bus caught fire once again) आग लागल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिक मदतीला धावून गेले आणि त्यांनी बसमधील प्रवाशांना मदत केली. आगीचा भडका प्रचंड असला तरी सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.


प्रवाशी घेवून जाणाऱ्या खाजगी बसला आग लागण्याची सलग दुसरी घटना घडली असून हा एक चिंतेचा विषय बनला आहे. खाजगी बस प्रवाशांना घेवून जातात परंतु बसची व्यवस्थित देखभाल करीत नाहीत शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली जात नाही हे नाशिकच्या घटनेनंतर दिसून आले आहे. नाशिक येथे बस जळून प्रवाशांचे बळी गेल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभाग जागा झाला असून त्यांनी खाजगी प्रवासी बसेसची तपासणी सुरु केली. यावेळी अशा बसमधून प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आणि आता प्रवाशांना आग लागल्याची ही दुसरी घटना सलग घडली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !