BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ मे, २०२३

विठ्ठल दर्शनाला निघालेल्या ७ जणांचा अपघाती मृत्यू !



शोध न्यूज : पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या वाहनाचा भीषण आणि भयंकर असा अपघात झाला असून या अपघातात एका बारा वर्षाच्या  मुलासह सात जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 


अपघाताचे प्रमाण अलीकडे भलतेच वाढले असले तरी, देवदर्शना निघालेल्या भाविकांच्या वाहनांच्या अपघातांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. आज पुन्हा कोल्हापूर येथून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अत्यंत भयावह असा अपघात झाला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी येथे ही घटना घडली असून यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात तीन महिला, तीन पुरुष आणि बारा वर्षे वयाचा एका मुलगा यांचा समावेश आहे, बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.


 बोलेरो आणि ट्रॅक्टरच्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापूरहून पंढरपूरला जाणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. विटानं भरलेला ट्रॅक्टर चुकीच्या दिशेनं आल्यानं दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. बोलेरो गाडी मधील प्रवासी सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. चुकीच्या दिशेने  विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरनं बोलेरोला धडक दिली आणि हा भयानक अपघात झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सगळे भाविक हे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे, एकाच गाडीतून हे भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला निघाले असताना मिरज बायपासला असलेल्या वड्डी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.  हा अपघात अंत्यत विचित्र पद्धतीने झाला आहे. भरधाव वेगाने समोरून येत असलेल्या एका ट्रकने बोलेरो गाडीला धडक दिली आणि तेवढ्यात समोरून अचानक विटांनी भरलेला ट्रॅक्टर आला. वेगात असलेली बोलेरो थेट जाऊन त्या ट्रॅक्टर वर आदळली आणि अत्यंत भयानक घटना घडली.


या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, अपघातात म्रुत्युमुखी पडलेले सगळे हे एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता पोलीसानी व्यक्त केली आहे. अपघाताची घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली.(Accidental death of 7 devotees who went to Pandharpur for Vitthal darshan) विचित्र प्रकारे झालेल्या या अपघातात कुणाची चूक आहे याचा अंदाज पोलीस घेत आहेत, त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पाहण्यात येत आहे. परंतु देव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने अर्ध्या वाटेत घाला घातल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !