BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ मे, २०२३

बेपत्ता बाळासाहेब माळी यांचा शोध लागला !



शोध न्यूज : आत्महत्या करतो, माझा शोध घेवू नका' असा संदेश देत बेपत्ता झालेले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी अखेर सापडले असून अनेकांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी कौशल्याने तपास करीत माळी यांचा शोध लावला आहे. 


'मी आत्महत्या करतोय, मला शोधू नका' असा संदेश सोशल मीडियावर देत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि दत्त कृपा पेट्रोल पंपाचे मालक, बाळासाहेब माळी हे  बेपत्ता झाले त्यामुळे  पंढरपूर तालुका हादरून गेला होता. सोमवारी रात्रीपासून भोसे परिसरात तर प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांचा मोबाईलही बंद लागत असल्यामुळे संपर्क होत नव्हता. कुटुंब आणि नातेवाईक यांनी त्यांची शोधाशोध केली परंतु कुठेच काही माहिती मिळत नव्हती. अखेर सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस ठाण्यात, माळी बेपत्ता होण्याची खबर दिली आणि पोलीस यंत्रणाही आपल्या कामाला लागली होती. पंढरपूर येथील कोळी नावाच्या एका व्यक्तीने आणि पुतण्याने आपली आणि आपल्या पत्नीची मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार त्यांनी सोशल मीडियावरून केली होती.


भोसे गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा अशा प्रकारे बेपत्ता होण्याने खळबळ तर उडालीच होती परंतु चिंता देखील व्यक्त करण्यात येत होती. कारण त्यांनी आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश सोशल मीडियावर दिला होता. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. या घटनेची सोलापूर जिल्ह्यात चर्चा होती परंतु भोसे परिसराला हा मोठा हादरा होता. अनेकजण बाळासाहेब माळी यांच्या चिंतेत होते. करकंब पोलिसांकडे याची खबर गेली तेंव्हा पोलीस वेगाने तपासाला लागले. गोपनीय माहिती, सायबर विभागाची मदत अशा सगळीकडून पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आणि बाळासाहेब माळी हे सातारा जिल्ह्यातील गोंदवलेकर महाराज मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.


सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, पंढरपूर विभागाचे उप विभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाण्याचे अधिकारी निलेश तारू यांनी बाळासाहेब माळी यांच्या शोधासाठी एक खास पथक नेमले. या पथकाने अत्यंत जलद गतीने माळी यांच्या संदर्भात माहिती मिळवली.  मोबाईल सीडीआर तसेच गोपनीय माहिती या पथकाच्या हाती आली. गोंदवलेकर महाराज मठाच्या परिसरात बाळासाहेब माळी असल्याची माहिती हाती येताच पोलिसांनी सातारा जिल्ह्याकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी माळी यांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले. माळी यांना सोबत घेवून पोलीस पंढरपूर तालुक्यात परतले आहेत. बाळासाहेब माळी यांचा शोध लागल्याने मोठा दिलासा लाभला आहे. 


माळी सुखरूप असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला असला तरी आता पुढे काय ? याचे उत्तर बाकी आहे. ज्यांनी फसवणूक केली असल्याची तक्रार माळी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केली होती, त्यांच्या विरुद्ध ते आता पोलीस ठाण्यात तक्रार देणार काय ? सुसाईड नोट आधारे पोलीस काय भूमिका घेतात ? अशा प्रश्नांची उत्तरे शिल्लक असली तरी ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे. (The police found the missing Balasaheb Mali) माळी यांच्या बेपत्ता होण्याने वाढलेली चिंता मात्र मिटली असून, पोलिसांनी त्वरित त्यांचा शोध घेतल्याने पोलिसांचे देखील कौतुक होताना दिसत आहे. 




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !