शोध न्यूज : 'मी आत्महत्या करतोय, मला शोधू नका' असा संदेश सोशल मीडियावर टाकून बेपत्ता झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा अद्याप कसलाही ठावठिकाणा न लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्हा परिषडेचे माजी सदस्य आणि दत्तकृपा पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब माळी यांच्या बेपत्ता होण्याने पंढरपूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे, शिवाय मोठी चिंता देखील व्यक्त होत आहे. भोसे परिसरात तर या घटनेने अनेकांना मोठा हादरा दिला आहे. सोमवारी रात्रीपासून बाळासाहेब हे बेपत्ता झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर 'आपण सह परिवार आत्महत्या करीत असल्याचा' एक संदेश व्हायरल केला आहे. आपली आणि आपल्या पत्नीची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून धमक्याही देण्यात आल्या आहेत. यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे देखील त्यांनी या संदेशात म्हटले आहे. संबंधितांची नावे देखील त्यांनी या नोटमध्ये नमूद केली आहेत.
बेपत्ता होण्याआधी बाळासाहेब माळी हे तणावात होते अशी माहिती आता समोर येत आहे. पेट्रोल पंपावरुन जाऊन येतो असे सांगून ते पेट्रोल पंपाकडे चालत निघून गेले. थोड्या वेळाने बाळासाहेब माळी यांचे मित्र बंडु भुईरकर हे घरी आले आणि बाळासाहेबांनी गाडीची चावी मागितली आहे असे त्यांनी सांगितले. गाडीची चावी त्यांना देण्यात आली आणि त्यानंतर बंडू भुईरकर हे गाडीची चावी आणि पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी (MH 13/ DM 9313) घेऊन गेले. या घटनेनंतर बाळासाहेब परत आलेच नाहीत. सोशल मीडियावर त्यांचा संदेश आला. 'आपण आत्महत्या करीत असून मला शोधण्याचा प्रयत्न करू नका' असा मेसेज पाहून अनेकांना धक्का बसला आणि त्यांची शोधाशोध सुरु केली. त्यांचा मोबाईल देखील बंद करण्यात आलेला होता. यावेळी नातेवाईकानी पाहुण्याकडे त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण माळी यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. शोधशोध केल्यानंतर अखेर सुरेखा माळी यांनी करकंब पोलीस ठाणे गाठले आणि बाळासाहेब माळी हे बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात दिली आहे.
सदर घटनेने पंढरपूर तालुक्यात, विशेषत: भोसे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांना बाळासाहेब माळी यांची चिंता वाटत असून, जो तो बाळासाहेबांची चौकशी करीत आहे. बाळासाहेब माळी हे नक्की कुठे आहेत याचा काहीच थांगपत्ता अद्याप लागला नाही त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करकंब पोलीस बाळासाहेब यांचा शोध घेत असून कुटुंबीय आणि नातेवाईक देखील शोधाशोध करीत आहेत. (Former Zilla Parishad member Balasaheb Mali is still missing) बाळासाहेब माळी यांचा शोध लागेपर्यंत ही चिंता अशीच राहणार आहे. शिवाय आता ज्यांच्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोप आहे, त्यांच्यावर कधी आणि काय कारवाई केली जाणार याकडेही पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !