शोध न्यूज : सासुरवाडीला आलेल्या जावयाची कार जाळून टाकण्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून याप्रकणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
जावई आला की सासुरवाडीत त्याचे कोडकौतुक केले जाते. सासुरवाडीच्या गावातील अन्य लोकही आदरातिथ्य करतात. सासुरवाडीच्या गावात जावयची कुणाशी दुष्मनी असत नाही पण तरीही सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथे एक वेगळाच प्रकार घडला असून गावात देखील या घटनेने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सांगोला येथील ज्ञानेश्वर भीमराव लिगाडे हे आपली चार चाकी गाडी घेवून सोलापूर जिल्ह्यातील मार्डी या गावी गेले होते. मार्डी ही त्यांची सासुरवाडी आहे. त्यांनी घराशेजारील मोकळ्या जागेत आपली चार चाकी गाडी उभी केली होती आणि ते आपल्या सासुरवाडीच्या घरी गेले होते. आपले सासरे सुनील श्रीमंत मुडके यांच्या घरी जावई लिगाडे हे सहकुटुंब गेले होते. त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली असल्याचे दिसून आले आणि गावात या घटनेचा निषेधही करण्यात आला.
लिगाडे यांनी आपली चार चाकी गाडी (एम एच ४५ ए क्यू ४०२५) घेवून सांगोला येथून गेले होते. सहकुटुंब तुळजापूर येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि तेथून ते मार्डी येथील आपले सासरे सुनील मुडके यांच्या घरी पोहोचले. मुडके यांच्या घराच्या जवळ असलेल्या रिकाम्या जागेत त्यांनी आपली कार उभी केली होती. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मात्र या कारला आग लागली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी धावत जाऊन पहिले असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची गाडी पेटवून दिली असल्याचे दिसून आले. अचानक घडलेल्या या घटनेने मुडके आणि लिगाडे कुटुंब गोंधळून गेले. त्यांनी पाणी मारून गाडीला लागलेली आग विझविण्याचा नेटाने प्रयत्न केला पण तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. संपूर्ण कार आगीने वेढली होती आणि ती जळून खाक झाली.
या आगीत कार जळून गेल्याने सात लाखांचे नुकसान झाले असून लिगाडे यांनी उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पाहुण्याची कार मध्यरात्री जाळून टाकण्याचा हा प्रकार गावातील अनेकांना रुचला नाही. मुडके कुटुंबाशी असलेल्या वैमनस्यातून कुणीतरी हा प्रकार केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Son-in-law's car was burnt in the middle of the night) गावात आलेल्या जावयाची कार जाळून टाकण्याचा झालेला प्रकार हा गावातील अनेक लोकांना निषेधार्ह वाटला असून पोलीस आता अधिक चौकशी करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !