BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मार्च, २०२३

लाखो रुपयांची रोकड कित्येक तास रस्त्याकडेला पडून !



शोध न्यूज : बँकेचे एटीम मशीन चोरून पळवले पण ते रस्त्याकडेला लपवून ठेवतानाच लोकांनी पाहिले आणि लाखो रुपयांचे घबाड सोडून चोरट्यांना पळ काढावा लागला. सोलापूर - पुणे रस्त्यावरील बोरीबेल रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


ग्राहकांना कुठल्याही वेळी त्यांचे पैसे मिळावेत म्हणून एटीमची सुविधा विविध बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे चांगली सोयही झाली आहे परंतु भामटे मंडळीना ही कमाईची जागा झाली आहे. जेष्ठ नागरिक तसेच अशिक्षित ग्राहकांना हातोहात लुटण्याचे हे एक ठिकाण तर बनले आहेच पण नजर चुकवून हे एटीम केंद्र चक्क फोडले जाते आणि त्यातून भली मोठी रक्कम पळवून नेली जाते. एवढेच काय, अख्खे एटीम मशीनच पळवून नेण्याच्या अनेक घटना आजवर उघडकीस आल्या आहेत. अशाच प्रकारे एका बँकेचे एटीम कापून पळवून नेण्याचा एक प्रयत्न मात्र अयशस्वी झाला असून पळवलेले एटीम रस्त्यात टाकून पळून जाण्याची वेळ काही चोरांवर आली असून नागरिकांचे लक्ष गेल्याने बँकेचे लाखो रुपये वाचले आहेत. बँकेचे एटीममशीन चार चाकी वाहनात घालून पळविण्यात या चोरट्यांना यश आले पण त्यातील रक्कम मात्र त्यांच्या नशिबात नव्हती हेच अखेर समोर आले आहे. 


सोलापूर- पुणे महामार्गावरील बोरीबेल रस्त्यावर असलेल्या बोरीबेल घाटात आज काही लोक अवजड वस्तू रस्त्याच्या बाजूला नेत होते. चार चाकी वाहनातून ही मोठी वस्तू काढून आडबाजूला नेली जात असल्याचे आज काही नागरिकांनी पहिले पण काहीतरी इलेक्ट्रिकल वस्तू असून काही काम सुरु असेल असा समज हा प्रकार पाहणाऱ्या लोकांचा झाला. प्रत्यक्षात एटीम मशीन गटारात लपविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता, पाहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला नसला तरी चोरट्यांची नजर या लोकांवर पडली होती. आपण पकडले जाऊ याची खात्री झाल्याने चोरांनी लाखो रुपये असलेली एटीम मशीन तेथेच टाकली आणि चार चाकी वाहनातून पळ काढला.कित्येक तास लाखो रुपये असलेली ही मशीन गटारात पडून होती परंतु याची माहिती कुणीच पोलिसांना दिली नाही. हा चोरीचा प्रकार असेल याचा अंदाजच कुणाला आलेला नव्हता.


अखेर काही नागरिकांनी याबाबत रावणगाव पोलिसांना याची माहिती दिली त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी ते मशीन गॅस कटरने तोडून पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मशीन न तुटल्याने त्यातील रक्कम तशीच राहिली. यामधून पाचशे रुपयाची एक नोट देखील बाहेर निघालेली होती. बारामतीच्या सुपे येथून पहाटेच्या सुमारास इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने तोडून चारचाकी वाहनातून चोरट्यांनी चोरून आणले होते. ते घाटात एका गटारात लपविण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु नागरिकांच्या वर्दळीमुळे त्यांचा हा डाव फसला गेला. (The ATM machine was stolen but the plan of the thieves failed) तब्बल ७ लाख १४ हजार रुपयांची रोकड या मशीनमध्ये होती आणि सुदैवाने यातील एक रुपयाही चोरीला गेला नाही. विशेष म्हणजे तब्बल चार तास लाखो रुपयांची ही रक्कम रस्त्याकडेलाच पडून होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !