BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ मार्च, २०२३

भावकीतील वाद, दोघांचा खून, चार जण जखमी !


शोध न्यूज : भावकीतील वाद चिघळला आणि तलवारीसह धारदार शस्त्राने सपासप वार करीत एकच कुटुंबातील दोघांचा खून करण्यात आला तर अन्य चौघे जखमी झाल्याची थरारक घटना जत तालुक्यात घडली आहे.


'सख्खे भाऊ पक्के वैरी' ही प्रचलित असलेली म्हण अनेकदा वास्तवात उतरताना दिसत असते. संपत्ती, शेतजमिनीची वाटणी अशा कारणावरून भाऊबंदकीत होणारे वाद टोकाचे असतात आणि अनेकदा अशा भावकीतील वादातून एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रसंग येतात. ग्रामीण भागात तर सख्खा भाऊच आपल्या भावाचा खून करतो. रक्ताच्या नात्याचाही विसर जमीनीपुढे पडत असतो. असाच एक धक्कादायक प्रकार आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथे घडला असून शेतजमिनीचा वाद एवढा उफाळून आला की जवळचे नाते देखील रक्ताळले गेले. भावकीतील एका कुटुंबावर तलवार आणि अन्य धारदार शस्त्रांनी जोरदार हल्ला चढविण्यात आला आणि यात काका पुतण्याचा मृत्यू झाला तर अन्य चार जण जबर जखमी झाले आहेत. 


कोसारी येथील दादासाहेब नामदेव यमगर आणि तानाजी बाबा यमगर या एकाच भावकीतील दोन गटात शेतीच्या हक्कावरून आपसांत वाद सुरूच आहेत. त्यातच आज तानाजी यमगर यांनी दादासाहेब यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी जेसीबी आणला. त्यामुळे दादासाहेब आणि त्यांचे कुटुंब संतापले. विहीर खोदण्यासाठी त्यांनी जोरदार विरोध केला आणि यातूनच पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. या वादातून तानाजी यमगर आणि अन्य काही जणांनी मिळून तलवार तसेच अन्य शस्त्रांनी प्रवीण यमगर आणि इतरांवर हल्ला चढवला. तलवारीच्या हल्ल्यामुळे प्रवीण यमगर यांचा जागीच मृत्यू झाला तर  जखमी झालेल्या विलास यमगर याला रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचाही मृत्यू झाला. 


जोरदार झालेल्या या वादात दोघांचा खून झाला तर अन्य चार जण जबर जखमी झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.  दादासो नामदेव यमगर (वय ४८), प्रवीण विलास यमगर (वय २०), यशवंत भाऊसो खटके (वय ५२, रा. गुळवंची) यांच्यासह अन्य गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  प्रशांत दादासो यमगर (वय २४), विलास नामदेव यमगर (वय ४४) यांचा मात्र या हल्ल्यात मृत्यू झाला असून कोसारी परिसर या घटनेने हादरून गेला आहे. भावकीतच झालेल्या वादाने टोक गाठले आणि ही घटना घडली आहे. ( shocking incident, Agricultural  dispute, two killed, four injured,)एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू आणि अन्य जखमी झाले आहेत त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आजच्या या घटनेने मात्र परिसर हादरून गेला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !