शोध न्यूज : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा चालक तर्राट झाला आणि नागमोडी वळणे घेत बस चालवू लागला त्यामुळे प्रवाशांत एकच खळबळ उडाली आणि अखेर त्याला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले.
कुठलेही वाहन असले तरी त्यात प्रवास करणाऱ्याचा प्राण चालकाच्या हाती असतो. चालकाने थोडीशी जरी बेफिकिरी केली तरी काही घडू शकते. गेल्या काही वर्षात तर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून रोज अनेक रस्त्यावर अपघात होत आहेत आणि या अपघातात अनेक निरपराध व्यक्तींचे जीव जात आहेत. रोज अशा घटना घडत असल्या तरी चालक आपल्या वेगावर आणि बेफिकीरीला लगाम घालत नाहीत असेच दिसते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास हा सर्वात सुरक्षित मानला गेला होता पण अलीकडे एस टी चे देखील अपघात वाढताना दिसत आहेत. शिवाय राज्य परिवहन महामंडळाचे काही कर्मचारी अत्यंत मुजोर आणि बेमुर्वत वागू लागल्याचा मोठा फटका एस टी प्रवाशांना बसत आहे. (As the ST driver was drunk, the passengers got scared, finally the bus stopped in the middle) त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सेवा काही लोकांमुळे बदनाम होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच एका कंडक्टरला दारू पिण्याची तलफ झाली आणि बहाद्दर वाहकाने बस रस्त्याकडेला उभी करून थेट बारमध्ये जाऊन बसला. दोन तास प्रवासी खोळंबले, काही प्रवासी अन्य मार्गाने निघून गेले. अखेर बसमधील प्रवाशानीच या वाहकाला शोधून काढले आणि त्याच्या मुसक्या आवळून बसमध्ये आणले तेंव्हा बस पुढे निघाली. बसमध्ये प्रवाशी असतानाही कंडक्टर तब्बल दोन तास गायब होता आणि तो एका हॉटेलमध्ये दारू पीत बसलेला होता. या घटनेची राज्यभर चर्चा झाली आणि आता पुन्हा एका चालकाने तर भलताच प्रकार केला असल्याचे समोर आले आहे. पुण्याहून पंढरपूर मार्गे सांगोल्याला जाणाऱ्या एस टी बाबत एक धक्कादायक प्रकार घडला असून प्रवाशांचे प्राण मोठ्या संकटात आणण्याचे काम या बसच्या चालकाने केले होते. झिंगाट असलेल्या या चालकाने राज्य परिवहन महामंडळाची बस तब्बल ६२ किलोमीटर नेली आणि नंतर प्रवाशांच्या लक्षात हा प्रकार आला. या चालकाच्या अजब पराक्रमाने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
पुण्याहून सांगोल्याकडे निघालेली ही बस (क्र. एमएच १४ बीटी ३५८४) भर दुपारी स्वारगेट बस स्थानकातून निघाली आणि स्थानकाच्या बाहेर येताच एका दुभाजकाला धडकली. यावेळी प्रवाशांच्या काहीच लक्षात आले नाही पण पुढे ही बस कधी अत्यंत वेगात तर कधी झोला खात रस्त्यावरून निघाली त्यामुळे प्रवाशी विचारात पडले. मधुनच चालक बस रेस देखील करीत होता त्यामुळे प्रवाशी काहीसे घाबरून त्याच्या या 'लीला' पाहत होते. नक्की काय चाललेय आणि असे का घडतेय याचा मात्र काही अंदाज प्रवाशांना येत नव्हता. ही बस पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेटपासून जाऊ लागली तेंव्हा मात्र या बसची चाल बदलली आणि बस नागमोडी चालू लागली. दरम्यान समोरून येणाऱ्या एका ट्रकला देखील कट मारला गेला आणि बस रस्ता सोडून साईड पट्टीने चालू लागली. या सर्व प्रकारामुळे बसमधील प्रवासी घाबरून गेले होते.
बसच्या एकंदर चालीमुळे प्रवाशांना शंका आली, चालकाने मद्यपान केले असावे याची खात्रीच प्रवाशांना झाली आणि त्यानंतर मात्र प्रवाशांनी घाबरून आरडाओरडा सुरु केला. चालक चालवत असलेल्या पद्धतीवरून कुठल्याही क्षणी प्रवाशांना धोका होऊ शकतो याची जाणीव झाली आणि प्रवाशांनी बस थांबविण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. चालकाने याकडे दुर्लक्ष केले पण काही प्रवासी आणि कंडक्टर यांनी चालकाला ही बस थांबविण्यास भाग पाडले. बस जेंव्हा थांबली तेंव्हा कुठे प्रवाशांच्या जीवात जीव आला.
राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभागाचे लाईन चेकर सहायक वाहतूक निरीक्षक कमर शेख, रावते, रफिक आतार हे नीरा परिसरातच होते, पालखी मार्गावर सांगोला आगाराची ही बस रस्त्याच्या खाली जाऊन का उभी आहे याची चौकशी त्यांनी केली तेंव्हा चालक संतोष वाघमारे हा मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी चालकाला नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले आणि बस नीरा बस स्थानकात आणली. या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे पाठविण्यात आले. या बसमधून तब्बल ५२ प्रवासी प्रवास करीत होते आणि नशेत असलेल्या चालकाने तब्बल ६२ किलोमीटर अंतर बस पुढे आणली होती. त्यामुळे आता बसमधून प्रवास करताना जसे तिकीट घेणे आवश्यक असते तसे चालकाची तपासणी करणेही आवश्यक ठरणार काय ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !