शोध न्यूज : भाजी विकून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या भाजी विक्रेत्याच्या खात्यात चक्क कोट्यावधी रुपये असल्याचे पाहून भल्याभल्यांचे डोळे तर फिरलेच पण आयकर विभाग देखील चौकशीसाठी धावल्याची एक वेगळीच घटना समोर आली आहे.
भाजी विक्रीचा व्यवसाय हा सामान्य आहे आणि या व्यवसायातून होणारी कमाई देखील नाममात्र असते. रोज सकाळी भाजी विकायची आणि कसाबसा आपल्या संसाराचा गाडा हाकायचा हेच उत्तर प्रदेशातील विनोद रस्तोगी याचा रोजचा शिरस्ता आहे. अत्यंत साधी राहणी आणि गरीबीतील त्याचा संसार अनेकजण पहात होते. प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला रस्तोगी भाजी विकून चार पैसे मिळविण्यासाठी सतत कष्ट करीत होता. लोकांच्या नजरेत तो एक गरीब भाजी विकणारा व्यक्ती होता पण अचानक त्याच्याकडे पाहण्याची सगळ्यांचीच नजर बदलून गेली. रस्तोगी हा कुणी सामान्य भाजी विक्रेता नसून तो एक अब्जाधीश आहे याची माहिती लोकांना मिळाली आणि सगळे तोंडात बोट घालून पाहायला लागले. रस्तोगीच्या खात्यात थोडेथोडके नव्हे तर १७२ कोटी ८१ लाख ५९ हजार १५३ रुपये शिल्लक असल्याची माहिती सगळीकडे पसरली. साहजिकच सगळीकडे खळबळ उडाली. एक गरीब, सामान्य भाजीविक्रेता आणि त्याच्या खात्यावर तब्बल १७२ कोटी रुपयांची रक्कम हा प्रकार ज्याला त्याला धक्का देणारा होता.
बँकेतील त्याच्या नावावर असलेल्या या रकमेने सगळ्यांना तर धक्का बसलाच पण स्वत: रस्तोगी यालाच हा मोठा धक्का होता आणि त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. रस्तोगी याच्या खात्यावर असलेले १७२ कोटी पाहून आयकर विभागाने चौकशी सुरु केली. आयकर विभागाची नोटीस येताच रस्तोगी याचे धाबे दणाणले. हा नक्की काय प्रकार आहे हेच त्याला समजेनासे झाले. प्रत्यक्षात त्याच्या बँक खात्यावर असलेली एवढी मोठी रक्कम ही त्याची नव्हतीच आणि अचानक तो एका रात्रीत अब्जाधीश बनून गेला होता. कुणाची तरी रक्कम त्याच्या नावावर ट्रान्सफर झालेली होती आणि आयकर विभाग त्याची चौकशी करू लागले होते. कधी आयकर विभागाशी कसलाही संबंध न आलेल्या रस्तोगीला आयकर विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळी आली होती. यामुळे तो कावराबावरा झाला होता. लोक दुसऱ्याचे पैसे आपलेच आहेत असे सांगत असतात पण याला एवढी मोठी रक्कम ही आपली नाही असे सांगत धावत सुटावे लागले होते. त्याच्यावर हे वेगळेच आर्थिक संकट कोसळले होते आणि समाजात या एकाच विषयाची चर्चा जो तो करू लागला होता.
आयकर विभागाची नोटीस आली तेंव्हा रस्तोगीला आपल्या नावावर १७२ कोटी रुपये बँकेत असल्याची माहिती मिळाली. वास्तविक गरीब असलेल्या विनोद रस्तोगी याचे बँकेत खातेही नव्हते त्यामुळे त्यात काही रक्कम असण्याचा प्रश्न येत नव्हता पण एवढी मोठी रक्कम असल्याने रस्तोगी याच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार ? घाबरलेल्या रस्तोगी याने जवळचे पोलीस स्टेशन गाठले आणि हे पैसे आपले नसल्याचे सांगितले. आपल्या आधार आणि पॅन कार्डचा कुणीतरी गैरवापर करून आपल्या नावाचे खाते बँकेत काढले असावे आणि ही रक्कम वळती केली असावी, हे खातेही आपले नाही आणि त्या खात्यावर आलेली मोठी रक्कमही आपली नाही असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला सायबर विभागाकडे जाण्यास सांगितले आहे. प्रत्यक्षात या बँक खात्याशी आणि त्यातील रकमेशी काहीही संबंध नसलेल्या रस्तोगी याला मात्र इकडून तिकडे हेलपाटे मारायची वेळ आली आहे.
आयकर विभागाने याची तातडीने चौकशी सुरु केली असून विनोद रस्तोगी याला मात्र शांत राहण्यास सांगितले आहे. आम्ही याची चौकशी करीत आहोत, आपण शांत राहावे असे आयकर विभाग म्हणत असला तरी गरीब भाजीवाल्याची झोप मात्र उडाली आहे. 'कुणाचे खाते, कुणाची रक्कम आणि कुणाची झोप खराब' असा सवाल तो विचारात असून या पैशाचा छडा लागेपर्यंत तरी रस्तोगी याला स्वास्थ्य लाभणे कठीण आहे. काहीच संबंध नसताना या गरीब भाजीवाल्याला सरकारी उंबरे झिजवावे लागत असून जिकडे तिकडे या भाजीवाल्याची चर्चा सुरु आहे. (The vegetable seller is poor but has accumulated crores in his account) गरीबाच्या आधार कार्डचा वापर करून कुणी त्याच्या नावावर बँकेत खाते काढले आणि १७२ कोटींची रक्कम त्याच्या खात्यावर कशी आली ? याचा उलगडा करण्यात आयकर विभाग गुंतले आहे. या घटनेने मात्र मोठी खळबळ उडवून दिली असून आपल्या कागदपत्रांचा कसा गैरवापर केला जाऊ शकतो हे देखील या घटनेने समोर आणले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !