शोध न्यूज : आर्थिक मदत होईल म्हणूनच तुझ्याशी लग्न केले म्हणत नवऱ्याने बायकोकडे तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यासाठी पत्नीचा छळ देखील केल्याची एक मोठी घटना सोलापुरात समोर आली आहे.
पत्नीच्या वडिलांच्या पैशावर डोळा ठेवून अनेकजण बसलेले असतात. पत्नी ही आपल्या घरातील महत्वाची सदस्य असतानाही माहेराहून पैसे आणण्यासाठी तिचा प्रचंड छळ केला जातो, कधी तिचा जीव घेतला जातो तर कधी छळाला कंटाळून ती स्वत: आत्महत्या करते. असा प्रकार केवळ गरीब, मध्यमवर्गीय लोकच करीत नाहीत तर गडगंज संपत्ती असलेले हावरट लोक देखील या फुकटच्या पैशाला चटावलेले असतात आणि त्यासाठी घराची शांती आणि जिला लक्ष्मी म्हटले जाते तिलाच छळले जाते. जमीन घेण्यासाठी, नवी गाडी अथवा बंगला घेण्यासाठी देखील पत्नीला प्रचंड प्रमाणात छळले जाते आणि यातून एक दिवस काही ना काही अप्रिय घटना घडते किंवा मग पोलीस ठाण्याच्या जाळ्यात अडकले जावे लागते. सोलापूर येथील एका बहाद्दर नवऱ्यावर तब्बल एक कोटी रुपये मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
संकटे अथवा काही मोठ्या अडचणी आल्या तर पै पाहुणे स्वत:च मदतीला धावत असतात पण दुसऱ्याच बाबीसाठी पैशाची गरज पडते आणि बँक असल्यासारखे पत्नीला छळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणायला सांगितले जाते. सोलापुरात श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या २८ वर्षे वयाच्या श्रावणी प्रेम पोटाबत्ती यांनी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ( Physical and mental harassment of wife by husband for dowry) घर, गाडी नव्हे तर फॅक्टरी खरेदी करण्यासाठी प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती याने पत्नीला एक कोटी रुपये आणायला सांगितले. आणि त्यासाठी श्रावणीचा छळ सुरु केला. विशेष म्हणजे पती आणि पत्नी हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यांचा विवाह देखील २०२० सालीचा झाला आहे.
पती प्रेम याने पत्नी श्रावणी यांना माहेरहून एक कोटी रुपये आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. त्याला पॉवरलूम फॅक्टरी खरेदी करायची होती आणि त्यासाठी त्याला पत्नीच्या वडिलांकडून एक कोटीची रक्कम हवी होती. यासाठी तो आपल्याच पत्नीला त्रास देऊ लागला. एवढ्यावर तो थांबला नाही तर 'तू मला पसंत नव्हती, तुझा पगार आणि आणि तुझ्या वडिलांची आर्थिक मदत होईल म्हणूनच तुझ्याशी लग्न केले आहे' असे देखील तो सांगू लागला. यातून त्याचा लग्नाचा हेतू आपोआप स्पष्ट होत असून हा हेतू साध्य होत नसल्याने प्रेम नावाचा नवरा या पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत राहिला. पैसे आणले नाहीत तर तुला नीट नांदवणार नाही असे देखील सांगत राहिला. या छळात पती प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती, सासू ज्योती श्रीनिवास पोटाबत्ती आणि सासरा श्रीनिवास पोटाबत्ती ( रा. सृष्टी नगर, अक्कलकोट रोड ) या तिघांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या माहेरून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम आणण्यासाठी त्रास दिला जात असल्याच्या या घटनेने अनेकांना धक्का दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !