शोध न्यूज : पिडीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तीन पोलीस अधिकारी आणि एका हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अलीकडील काळातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.
महिला तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढत असताना पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पोलिसांनी सक्षमपणे काम केले तरच महिलावरील अत्याचाराला लगाम लागणार आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तीन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस हवालदार यांच्यावर अशा प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे त्यामुळे सोलापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मंगरुळे, महिला पोलीस निरीक्षक सारिका बजरंग गटकुळ हवालदार अरुण भगवान माळी यांचा समावेश आहे. पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करण्यात आला होता आणि नंतर हल्ला करण्यात आला. हे प्रकरण बार्शी तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात विशेष चर्चिले गेले. अशा गंभीर प्रकरणी पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे.
बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ५ मार्च रोजी सायंकाळी आपल्या घरी निघाली असताना तिच्यावर बलात्कार होण्याची धक्कादायक घटना घडली होती. रेल्वेच्या फाटकाजवळ दोघांनी तिला अडवले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची तक्रार बार्शी पोलिसात देण्यात आली होती. एवढ्या गंभीर घटनेची तक्रार पिडीत मुलीने पोलिसात दिली असतानाही पोलिसांनी सदर आरोपींना अटक करण्यात हयगय केली आणि पुढील आणखी एक गुन्हा घडला. बलात्कार करणाऱ्या आरोपींनी दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार केले आणि या हल्ल्यात सदर मुलगी जखमी झाली. आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर पोलिसात तक्रार दिल्यावर तिच्यावर घरी जाऊन प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यामुळे परिसर थरारून गेला. सदर मुलगी या हल्ल्यात जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची अत्यंत गंभीर आणि मोठी घटना घडली असताना आणि पिडीत मुलीने तशी तक्रार दिली असतानाही पोलिसांनी तातडीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाहीत त्यामुळे पुढील घटना घडू शकली.
बलात्कारासारखा गुन्हा करूनही दुसऱ्या दिवशी पिडीतेच्या घरी जाऊन हल्ला करण्याची मजल आरोपींची गेली त्यामुळे कायदा आणि पोलीस यांची जराशीही भीती या आरोपींना नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर हल्ल्याची घटना तरी घडली नसती त्यामुळे पोलिसांबाबत जनमानसात नाराजीची आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. जनतेत संतापाची भावना असतानाच पोलीस विभागाने देखील कडक भूमिका घेत तीन पोलीस अधिकारी आणि एक हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर जनतेत काहीसे समाधान असून पोलीस दलात मात्र या कारवाईचा मोठा धसका घेतला आहे. (Three police officers including a constable suspended, Solapur gramin) गुन्हा दाखल होऊन देखील आरोपींना अटक न करणे, आपल्या कर्तव्यात कसूर करणे अशा कृतिबद्धल अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्त्यव्य प्रामाणिकपणे करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईलच असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी स्पस्थ केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !