शोध न्यूज : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेली महागडी काळी हळद स्वस्त दरात देतो असे सांगून ६५ लाखांना गंडा घालणारी एक टोळी सोलापूर जिल्ह्यात गजाआड करण्यात आली असून फसवणुकीचा हा वेगळाच फंडा समोर आला आहे.
बदलत्या काळात फसवणुकीचे विविध फंडे समोर येत असतात आणि नवनव्या युक्त्या करून सहजासहजी कुणालाही फसवले जाते. फसविण्याचे वेगवेगळे प्रकार अनेकांच्या अनुभवाला येत असून काही क्षणात बँकेचे खातेही रिकामे केले जाते तर कधी पोलीस असल्याची बतावणी करीत भर रस्त्यावर देखील मोठी लुट केली जाते. सायबर फसवणुकीची तर मोठी लाट आली असल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र एका टोळीने एक वेगळाच फंडा अमलात आणला आणि तब्बल ६५ लाखांची काळी हळद लावली पण संशय येताच पोलिसाशी संपर्क साधला गेल्याने सहा जणांची एक मोठी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. कोट्यावधी रुपये कमाविण्याची संधी असल्याचे आमिष दाखवत श्रीमंत व्यक्तीला लाखोंना गंडा घालण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील पटेल यांची फसवणूक करण्यात आल्याचे हे प्रकरण असून याबाबत आज पोलिसांकडून सविस्तर आणि तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. युरोपात काळ्या हळदीला मोठी मागणी असते आणि यातून कोट्यावधी रुपये कमाविण्याची संधी आहे. आपण ही काळी हळद स्वस्त देण्यास तयार आहोत असे सांगत गंडा घालणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणात एक टोळीच असल्याचे आढळून आले असून अकलूज परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे सहा आरोपी पटेल यांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून होते. अलिशान तीन गाड्या घेऊन हे भामटे अकलूज येथे आले होते. समोरच्याची सहज फसवणूक होईल अशा प्रकारचे त्यांचे वर्तन होते आणि अकलूज येथे जाऊन त्यांनी आपला प्रताप दाखवला पण अखेर त्यांना गजाआड जाण्याची वेळ आली.
काळी हळद देण्याचे सांगून या भामट्यांनी पटेल यांच्याकडून मोठी रक्कम नेली असतानाही त्यांना ठरल्याप्रमाणे हळद दिली नाही. काळ्या हळदीची जादू पाहण्यासाठी परदेशातून एक महागडा सूट खरेदी करणे आवश्यक असते आणि या सूट साठी ७० लाख रुपये लागतात अशी बतावणी या भामट्यांनी पटेल यांना केली. काळी हळद एका ठिकाणी ठेवल्यावर बंद दरवाजांचे कुलूप आपोआप उघडले जाते अशा प्रकारचा एक व्हिडीओ देखील त्यांनी पटेल यांना दाखवला आणि मोठी रक्कम कमाविण्याची ही संधी असल्याचे सांगितले होते त्यामुळे पटेल यांनी विश्वास ठेवून या भामट्यांच्या हातात ६० ते ६५ लाखांची रक्कम दिली होती. (Lakhs cheated in the name of magical black turmeric, gang arrested) त्यानंतर देखील हे भामटे आले आणि आणखी रक्कम मागू लागले त्यामुळे पटेल यांना संशय आला.
काळी हळद हा पैसे कमविण्याचा मोठा मार्ग असल्याचे ते पुन्हा पुन्हा सांगत होते पण पटेल यांना संशय आल्याने त्यांच्या डोक्यात काही वेगळाच विचार सुरु झाला होता. आपली फसवणूक होत असल्याची जाणीव पटेल यांना झाली होती त्यामुळे त्यांनी अकलूज पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरु केल्यावर सगळेच काही बाहेर येऊ लागले. हे फसवणूक करणारे भामटेच आहेत याची पोलिसांना खात्री झाली आणि सगळे बिंग फुटले. बारकाईने चौकशी करून पोलिसांनी या सहा जणांच्या टोळीला अटक करून गजाआड पाठवले आहे. या भामट्यांनी आणखी अशाच प्रकारे किती जणांना फसवले आहे याचाही शोध आता पोलीस घेवू लागले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !