BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मार्च, २०२३

पंढरपूर येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात राडा !!

 


शोध न्यूज : रंगपंचमीचे  रंग खेळले जात असताना पंढरपूर गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात एक वेगळाच राडा झाल्याची माहिती समोर आली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यास एका शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. 


आज रंगपंचमीचा दिवस असल्याने सगळे आनंदाने रंग खेळण्यात व्यस्त होते. रंगाची उधळण करीत जीवनाच्या रंगाचा आनंद घेण्यात सगळे मश्गुल असताना पंढरपूर येथील गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात वेगळेच रंग उधळले गेल्याचा गुन्हा दाखल होत होता. उधळलेले हे रंग अखेर पोलीस ठाण्यापर्यंत गेले आणि सरकारी कार्यालयात रंगलेला हा प्रकार जनतेसमोर आला. पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संजय माधव बरमादे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील उप 
शिक्षक  ज्योतीराम रोकडे यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बरमादे हे  शासकीय कार्यालयीन कामकाज करीत कार्यालयात बसले होते. यावेळी भटुंबरे येथील मुख्याध्यापक रोकडे कार्यालयात आले आणि त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केलीच पण लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने म्हटले आहे. 


उप शिक्षक रोकडे हे मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्या अवस्थेत त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचे कर्मचारी संजय बरमादे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  रोकडे यांनी जोरदार हल्ला केला आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याने छातीला तसेच डोक्याला मार लागला असल्याने या कर्मचाऱ्याने म्हटले आहे. मार लागल्याने कर्मचारी बरमादे हे उपचारासाठी पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. (Different colors on Rangpanchami day! Beating in Education Officer's office) पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात  रोकडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगपंचमीच्या दिवशी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उधळल्या गेलेल्या या रंगांची चर्चा पंढरपूर तालुक्यात आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक विभागात मोठया चवीने केली जाऊ लागली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !