BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मार्च, २०२३

पंढरपूर तालुक्यात एकच दिवशी दोन विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू !


शोध न्यूज : एकाच दिवशी पंढरपूर तालुक्यातील दोन विद्यार्थिनींचा वेगवेगळ्या कारणांनी अपघाती मृत्यू झाल्याची अंत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून एका मुलीचा झाडाची फांदी पडून तर दुसऱ्या मुलीचा ट्रॅक्टरखाली मृत्यू झाला आहे. 


गुरुवारचा दिवस हा पंढरपूर तालुक्यासाठी अत्यंत दु:खद आणि वेदना देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब परिसरात या दोन्हीही अत्यंत वेदनादायक घटना घडल्या असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे एकाच भागात एकाच दिवशी या दोन अप्रिय घटना घडल्या आहेत. एक घटना पेहे येथे तर दुसरी घटना बार्डी येथे घडली आहे. राधा आवटे ही दहावीची विद्यार्थिनी पेहे येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. दहावीची परीक्षा सुरु असल्यामुळे ती परीक्षेसाठी गेली होती आणि पेपर संपवून बार्डी येथे आपल्या बहिणीकडे निघालेली असताना तिच्या अंगावर झाडाची फांदी पडली आणि या फांदीने तिचा जीव घेतला.रस्त्याच्या कडेलाच असलेल्या झाडाची फांदी राधाच्या अंगावर पडून ही दुर्घटना घडली. अंगावर फांदी पडल्याने तिचा मृत्यू ओढवला असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.  


दुसरी घटना देखील करकंब परिसरातच घडली असून सातव्या इयत्तेत शिकत असलेल्या १३ वर्षीय अक्षरा उर्फ दिव्या देविदास जमदाडे या विद्यार्थिनीचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाल्याची अत्यंत वाईट घटना घडली. भोसे येथील यशवंत विद्यालयात शिकत असलेली अक्षरा ही आपल्या शाळेतून घराकडे निघालेली असताना भोसे पाटी चौकात एका ट्रॅक्टरखाली सापडून तिचा मृत्यू झाला. चौकातील सद्गुरू हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाचा दरवाजा अचानक उघडला गेला आणि त्यामुळे या दरवाजाचा धक्का लागला आणि याचवेळी बाजूने जात असलेल्या एका ट्रॅक्टरच्या खाली अक्षरा पडली. या घटनेत ती जखमी होऊन बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने भोसे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.


दोन्ही घटना या करकंब परिसरातील असून दोन्ही घटनात दोन विद्यार्थिनींचा बळी गेला आहे. भोसे चौकात अपघात होण्याची ही काही पहिली वेळ नसून यापूर्वी देखील येथे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. (Accidental death of two female students on the same day in Pandharpur taluka) रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटलेली असल्याने आणि चौकाचा भाग असल्यामुळे येथे सतत गर्दी आणि वाहनाची वर्दळ असते. भोसे परिसरातील अनेक गावातून विद्यार्थी याच चौकातून येत असतात त्यामुळे हा चौक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोक्याचा बनला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !