BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ फेब्रु, २०२३

वाढदिवस विसरला, बायकोने नवऱ्यासह सासूलाही 'धुतले' !

 


शोध न्यूज : नवरा आपला वाढदिवस विसरला याचा बायकोला आला भलताच राग आणि तिने नवऱ्यासह सासूलाही धू धू  'धुतले' असून हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचले आहे. 


माणसाच्या आयुष्यात वाढदिवसाला अलीकडे खूपच महत्व येऊ लागले आहे. अबालवृद्धांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि  परस्परांना शुभेच्छा देत भेट वस्तूही दिल्या जातात. समाजमाध्यमांवर तर शुभेच्छा संदेशाचा वर्षाव असतो. हा सगळं कोरडेपणा असला तरी तो हमखास केला जात असतो. आनंदाचा दिवस मानला जात असलेला वाढदिवस काहींच्या दृष्टीने भावनिक देखील असतो. पत्नीचा वाढदिवस हा तर एक नाजूक विषय असतो. आपल्या वाढदिवसाला पतीने कामावरून सुट्टी घ्यावी, दिवसभर घरात थांबावे आणि पतीने आपल्याला जेवायला बाहेर घेऊन जावे तसेच एक छानशी साडी आणून द्यावी अशी पत्नीची वाढदिवसादिवशी अपेक्षा असते. अर्थातच असे काही नाही घडले की पत्नी नाराज होते. मुंबईत मात्र एका बायकोची नाराजी संतापात बदलली आणि तिने घरातल्या लोकांचीच 'धुलाई' केली. 


वाढदिवसाच्या निमित्ताने कोडकौतुक तर सोडाच पण नवरा आपल्या बायकोचा वाढदिवस असल्याचे विसरला आणि मग हे प्रकरण केवळ नाराजीवर थांबले नाही तर पत्नीचा संताप अनावर झाला. रौद्र रूप धारण केलेल्या या बायकोने भलताच धिंगाणा घातला. आपला भाऊ, आई वडील यांच्या मदतीने  नवरा आणि सासू यांना धू धू धुतले. एकाच वेळी या सगळ्यांना चोपून काढले.  आपला नवरा आपला वाढदिवस विसरला म्हणून संतापलेल्या २७ वर्षीय महिलेने आपल्या भावाला आणि आई वडिलांना बोलावून घेतले. ते देखील लेकीच्या बोलावण्यानुसार लेकीच्या सासरी पोहोचले. आपला वाढदिवस कुणी लक्षात ठेवत नाही याबाबत या महिलेने आपल्या आई वडील आणि भावाकडे संतापाने गाऱ्हाणे मांडले आणि नंतर या महिलेने आपला नवरा आणि सासू यांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा भाऊ आणि आई वडील देखील सहभागी  झाले.  बेदम मारहाण तर केलीच पण वाहनाचे देखील नुकसान केले. 


कुरियर कंपनीत चालक असलेल्या विशाल नांगरे याची पत्नी कल्पना ही देखील एका फूड आउटलेटमध्ये काम करते. चार वर्षांपूर्वी लग्न झालेले नांगरे कुटुंब गोवंडीच्या बैंगणवाडी येथे राहते.  कल्पना हीच १८ फेब्रुवारीस वाढदिवस होता परंतु त्याची आठवण विशाल याला राहिली नाही. आपला नवरा आपला वाढदिवस विसरला याचा भलताच संताप कल्पनाला आला आणि यातून पती पत्नीच्या जोरदार भांडण झाले. दुसऱ्या दिवशीही कल्पना कामावर घरी आली तेंव्हा नवरा आणि सासू याना शिवीगाळ करू लागली. 'मला आता तुझ्यासॊबत राहायचेच नाही' असे म्हणत तिने आपला वेगळाच इरादा उघड केला. एक दिवसाचा वाढदिवस नवरा विसरला पण या महिलेच्या डोक्यात रागाने घर केले होते. नवऱ्याची चूक झाली असली तरी एवढ्या किरकोळ बाबीचा तिने भलताच गंभीरपणे विचार केला आणि नवऱ्याचे घर सोडण्यापर्यंत तिने विचार केला.  


मनातून प्रचंड खवळलेल्या कल्पनाने आपल्या आईवडिलांना आणि भावाला बोलावून घेतले आणि  ते आल्यानंतर सासू आणि नवऱ्याची धुलाई करीत वाहनांची देखील तोडफोड केली. खिडकीच्या काचा फोडत सासूच्या कानाखाली देखील या महिलेने मारले. (Wife beats husband and mother-in-law for forgetting birthday)  हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेले असून पोलिसांनी कल्पनासह तिच्या आईवडिलांवर आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.  वाढदिवस विसरणे देखील किती महागात पडू शकते हे या नवरोबाला आणि त्याच्या आईला देखील कळून चुकले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !