BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२२

महावितरणचे तरुण तंत्रज्ञाचा गणेश विसर्जनावेळी बुडून मृत्यू !

 



शोध न्यूज : गणेश विसर्जनासाठी गेल्यानंतर महावितरणचे तरुण तंत्रज्ञ विहिरीत बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून अशा घटनांचे लोण सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे.


आनंदात दहा दिवस गणेशोत्सव साजरा करून गणपती बाप्पांना निरोप देताना राज्यात काही वाईट घटना घडल्या असून लहान मुलांचाही यात मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जन करण्यासाठी गेल्यानंतर दरवर्षी हमखास अशा घटना घडताना दिसतात, यावर्षीही राज्याच्या विविध भागातून हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत . दहा दिवसांचा गणेशोत्सवाचा आनंद अशा घटनांनी हिरावून घेतलेला असून सोलापुरात देखील एका तरुणाचा अशाच प्रकारे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गणेश विसर्जन करण्यासाठी ते एका विहिरीवर गेले होते आणि त्याच विहिरीत पडून, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर येथील हत्तुरे वस्ती येथे राहणारे ३२ वर्षे वयाचे विजय भीमाशंकर पनशेट्टी हे महावितरण विभागाकडे तंत्रज्ञ म्हणून काम करीत होते. त्यांच्या पत्नीने दोन वर्षांपूर्वीच आत्महत्या केल्याने त्यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावर होती.  विजय पनशेट्टी यांनी आपल्या मित्रांसमवेत विश्व विनायक हरीओम गणेश मंडळ स्थापन केले होते. (Mahavitaran's young technician drowned during Ganesh immersion)कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात या मंडळाने गणेशाची स्थापना केली नव्हती त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करून अत्यंत आनंदात आणि उत्साहात दहा दिवस हा उत्सव साजरा केला. विजय पनशेट्टी हे स्वत: गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांनी हिरीहीने सहभाग घेतला होता. 


या मंडळाच्या गणेश विसर्जनासाठी गणेश भक्त टिकेकरवाडी येथील एका विहिरीकडे गेले होते. वाजत गाजत विसर्जन मिरवणूक विहिरीजवळ पोहोचली आणि नंतर विसर्जन करण्यासाठी विजय पनशेट्टी हे गणेशमूर्ती घेवून विहिरीत उतरले. यावेळी गणेश मूर्तीच्या सोबत विजय पनशेट्टी हे देखील पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्याचा आणि नंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण त्यात यश आले नाही. अखेर काही तासांच्या अवधीनंतर जीवरक्षक दल आणि पोलिसांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दहा दिवस आपल्यासोबत आनंदाने उत्सव साजरा करणाऱ्या विजय पनशेट्टी यांचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा याचे प्रचंड दु:ख मंडळाच्या कार्यकर्त्यांना झाले असून त्यांचा लहान मुलगा आणि आई वडील आता पोरके झाले आहेत. हत्तुरे वस्तीचा परिसर शोकाकुल झाला असून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 


शापित विहीर !
सदर विहीर ही शापित असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त करून ही विहीर बुजविण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे. सतत या विहिरीत कुणी ना कुणी आत्महत्या करीत असते. शिवाय या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ देखील आहे. विजय पनशेट्टी हे विहिरीत बुडाले तेंव्हा ते गाळात अडकले होते. त्यांच्या मृतदेहासोबत गाळ, पालापाचोळा आढळून आला होता.      





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !