BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२२

शिंदे गटातील एका आमदारांची आमदारकी धोक्यात !



शोध न्यूज : शिंदे गटातील एका आमदारांची आमदारकी आता पूर्णपणे धोक्यात आलेली असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे शिंदे गटातील एक आमदार आता कमी होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे.


शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारात चोपडा मतदारसंघातील आमदार लता सोनवणे यांचा देखील समावेश आहे. शिवसेनेतून बंडखोरी केली परंतु त्यांची आमदारकी आधीपासूनच धोक्यात आली होती, आता यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय घटनापीठाने आमदार लता सोनवणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय दिला आहे. त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या बाबतचा निर्णय न्या. के एम जोसेफ आणि न्या. ऋषिकेश रॉय यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे आमदार सोनावणे यांचा शेवटचा मार्ग देखील संपला आहे. फार तर त्या पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात.  


आ. सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातून 'अनुसूचित जमाती' या प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. आमदार लता सोनवणे (MLA Lata Sinavane) शिवसेनेत असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी आणि अर्जुनदास वसावे यांनी सोनवणे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार त्यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी त्यांचा जातीचा दाखलच अवैध असल्याबाबत औरंगाबाद खंडपीठाकडे एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी नंदुरबार जात पडताळणी समितीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 


जातपडताळणी समितीने आ. लता सोनावणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते आणि त्याच वेळी त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. जात पडताळणी समितीने हा निर्णय दिल्यानंतर आ. सोनवणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु तेथेही त्यांची याचिका फेटाळून लावली. (Legislation of one MLA from Shinde group is in danger) त्यानतंर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली परंतु सर्वोच्च न्यायालयानेही जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला आहे त्यामुळे आ. लता सोनवणे यांना  मोठा धक्का बसला असून त्यांच्या आमदारकीला धोका निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता त्यांच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक उरलेला नाही. फार तर त्या सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात. 


गुन्हा दाखल करावा 

  लता सोनवणे यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करावा तसेच पुढील प्रक्रिया प्रशासन आणि निवडणूक आयोगाने जलदगतीने करावी अशी मागणी तक्रारकर्ते माजी आमदार वळवी यांनी केली असून विधानसभेत दोन नंबरची मते मिळविलेल्या उमेदवाराला विजयी म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनवणे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येवून त्यांनी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाणे पसंत केले होते. 


पुन्हा कोर्टात जाणार !

या निर्णयाने आमदारकी रद्द होणार नसून आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायलयात जाणार आहोत असे आ. लता सोनवणे यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी म्हटले आहे.  आ. सोनवणे या अपात्र ठरत असल्यामुळे शिंदे गटातील चाळीसपैकी एक आमदार कमी होणार हे मात्र आता स्पष्ट झाले आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !