BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ फेब्रु, २०२३

पावडरच्या उग्र वासाने दोन चिमुकल्यांचा बळी !


शोध न्यूज : पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांचे प्राण धोक्यात आले असून धान्यासाठी वापरण्याच्या पावडरच्या उग्र वासाने दोन चिमुकल्यांचा बळी गेल्याची अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. 


पालकांच्या व्यस्त असण्याचा दुष्परिणाम सतत दिसत असून वडील कामानिमित्त बाहेर आणि आई घरकामात गुंतल्याने लहान मुलांचे प्राण धोक्यात येत आहेत. बाळाच्या पुढे खेळण्यासाठी काही टाकून आई स्वयंपाकघरात व्यस्त राहते आणि दरम्यान बाळ काही घातक वस्तू गिळते. अशा वस्तू घशात अडकतात किंवा पोटात जातात आणि मग त्रास होऊ लागल्यावर दवाखाना पहिला जातो. शस्त्रक्रिया करून अशा वस्तू काढल्या जातात परंतु काही वेळा बाळाचा जीव धोक्यात येतो. कराड तालुक्यातील मुंडे गावात तर वेगळीच घटना घडली असून पालकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. धान्याची साठवणूक करण्यासाठी वापरली जात असलेल्या पावडरच्या उग्र वासामुळे चिमुकल्या भाऊ बहिणीचा मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. धान्याची साठवणूक करताना ते खराब होऊ नये अथवा कीड लागू नये यासाठी पावडरचा उपयोग केला जातो पण हीच पावडर या मुलांच्या जीवावर उठली आहे. 


धान्यात टाकण्यासाठी माळी कुटुंबाने अशी पावडर घरी आणली होती. या पावडरच्या उग्र वासाने श्लोक माळी आणि तनिष्का माळी या दोन चिमुकल्या भावंडाना त्रास होऊ लागला. सुरुवातीला अस्वस्थ वाटू लागले आणि नंतर रात्रीच्या वेळेस उलट्या आणि खोकला असा त्रास होऊ लागला. हा त्रास वाढतच गेला आणि त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले परंतु उपचार सुरु असताना दोघांचाही मृत्यू झाला. (Two children died due to the strong smell of poisonous powder) धान्य साठवण करण्याच्या प्रयत्नात भावंडांचा मृत्यू ओढवला गेल्याची ही घटना जेवढी धक्कादायक तेवढीच ती चिंताजनक देखील ठरली असून या घटनेने परिसर हळहळून गेला आहे. कुठली बाब कशी कुणाच्या जीवावर बेतू शकते याचे हे मोठे उदाहरण आहे. पालकांनी मुलांची काळजी किती बारकाईने घेण्याची आवश्यकता आहे हेच या दुर्दैवी घटनेने अधोरेखित केले आहे. 


खेळता खेळता मृत्यू !

या दोन भावंडाचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला असला तरी अशा प्रकारच्या काही घटना आधीही घडल्या आहेत. नागपूर येथे नुकतेच डास मारण्यासाठी आणलेले औषध तोंडात गेल्याने अवघ्या दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रिद्धी चौधरी या चिमुकल्या मुलीच्या तोंडात मच्छर मारण्याचे औषध गेले. खेळता खेळता तिच्या हाताला या औषधाची बाटली लागली आणि तिने सहज ती तोंडात घातली, त्यातील औषध तिच्या तोडत गेले आणि काही क्षणात प्रकृती बिघडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखलही केले गेले पण उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. नुकतीच ही घटना घडली असताना पुन्हा चिमुकल्या भाऊ बहिणीचा पावडरच्या वासाने मृत्यू होण्याची घटना समोर आली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !