शोध न्यूज : एका शेतकऱ्याने शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तब्बल एक कोटीपेक्षा अधिक किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शेतात चोरट्या पद्धतीने गांजा लागवड करण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतात गांजाची लागवड करण्याचा हा प्रकार किमान महाराष्ट्रात तरी अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे. ऊसाच्या फडात, कांद्याच्या पिकात गांजाची झाडे आढळून येतात. अनेक शेतकरी चोरट्या पद्धतीने अशी लागवड करीत असतात. देशात गांजा लागवड करण्यास कायद्याने बंदी आहे याची माहिती असतानाही शेतकरी पैसा मिळविण्यासाठी हे बेकायदा काम करीत असतात. गांजाची लागवड कितीही चोरट्या पद्धतीने केली तरी त्याचा "वास" पोलिसांना लागतोच आणि एक दिवशी कारवाई होऊन शेतकरी तुरुंगात जातो अशा घटना नेहमीच घडताना दिसतात. तरीही शेतकरी पैसा मिळविण्याच्या उद्देशाने हे धाडस करतो. माण तालुक्यातील लोणार खडकी गावातील एका शेतकऱ्याने केलेले धाडस पाहून पोलिसांचे डोळेही विस्फारले आहेत. तब्बल एक कोटीपेक्षा अधिक किमतीचा गांजा एकाच शेतकऱ्याच्या शेतात आढळून आला आहे.
कुंडलिक निवृत्ती खांडेकर या शेतकऱ्याने आपल्या डाळींबाच्या बागेत मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली. गांजाची हिरवीगार रोपे तरारून आकाशाच्या दिशेने झेपावत राहिली. हा गांजा विकला गेला की बक्कळ पैसे हातात येतील अशी आशा या शेतकऱ्याला लागली. आधी किरकोळ प्रमाणात हा शेतकरी गांजा लागवड करीत होता आणि त्यातून त्याला पैसाही मिळत होता. त्याचे हे प्रकार खपून गेले त्यामुळे त्याला गांजा लागवडीतून मुबलक पैसा मिळविण्याचा मोह झाला आणि त्याने गांजाचेच प्रमुख पिक घेतले. डाळिंब बाग केवळ नावाला ठेवली आणि शेतात गांजाची हिरवळ फुलून आली. रोपे तब्बल सात फुट उंचीपर्यंत वाढली होती. आता थोड्याच दिवसात या 'हिरवळीचा' पैसाच पैसा होणार होता पण त्याआधीच या गांजाचा 'वास' पोलिसांना लागला आणि पोलिसांनी थेट या शेतात हजेरी लावली.
गांजा लागवडीची पक्की खबर पोलिसांना लागली होती पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लागवड असेल याचा अंदाजही पोलिसांना नव्हता. शेतात जेंव्हा प्रत्यक्ष ही 'हिरवळ' पाहिली तेंव्हा पोलिसांच्याही भुवया उंचावल्या गेल्या. शेतात डाळिंब बागेत तब्बल १ हजार ३३१ गांजाची झाडे तरारून उभी होती आणि हवेसोबत ही झाडे झोके घेत होती. पोलिसांनी ही सगळी झाडे काढली आणि आपल्या ताब्यात घेतली. या गांजाचे वजन तब्बल ४२३ किलो एवढे झाले. (Big operation, cannabis worth one crore in pomegranate crop) बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत १ कोटी ५ लाख ७५ हजार रुपये एवढी आहे. सातारा जिल्ह्यातील अमली पदार्थाविरोधातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यास अटक केली असून या घटनेने परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेरही मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !