शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील मालक असलेल्या किराणा दुकानाला मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे मोठी आग लागली असून या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील शिवाजी चौकात पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील दिलीप वाघमोडे यांचे किराणा दुकान आहे. या दुकानाला आज अचानक आग लागली आणि काही क्षणात या आगीने मोठे स्वरूप धारण केले. किराणा दुकान असल्यामुळे दुकानात गोडे तेल आणि खोबरेल तेल याचा देखील साठा असल्यामुळे आग वेगाने भडकली. गजबजलेल्या भागात हे दुकान असल्याने दुकानाला आग लागल्याने परिसरातील नागरिकांना लगेच जाणवले आणि त्यांनी ही आग विझविण्याचा नेटाने प्रयत्न केला परंतु आग भडकतच राहिली. (A terrible fire broke out at a grocery store in Mohol taluka) दुकानातील सर्व किराणा माल आगीच्या स्वाधीन झालेला होता आणि आग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. आग विझविण्याचा आणि दुकानातील माल बाहेर काढण्याचा प्रयत्न लोक करीत होते पण अपेक्षित यश येत नव्हते.
सदरची आग नेमकी कशामुळे लागली हे लगेच समजू शकले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आगीच्या ज्वाळा आणि दूरचे लोट उसळत होते आणि एकूण परिस्थिती भलतीच चिंताजनक दिसत होती. जवळच असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला येथे पाचारण करण्यात आले शिवाय पंढरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक यंत्रणेलाही बोलावण्यात आले होते. या दोन्ही यंत्रणांनी सदर आग आटोक्यात आणली परंतु दरम्यान दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान या आगीने केले होते. दुकान मालक वाघमोडे हे अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत दिसत होते. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे दुकान जळून खाक झाले तर लाखो रुपयांचे नुकसान देखील या आगीने केले आहे. ठोक आणि किरकोळ मालाचे हे किराणा दुकान असल्यामुळे या दुकानात मोठ्या प्रमाणात माल ठेवलेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !