BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२३

अबब ! शेतकऱ्यांनी कालव्याचा मार्गच बदलला, जुना बुजवून नवा फाटा केला तयार !

 


शोध न्यूज : जुन्या कालव्याचा फाटा परस्पर बुजवून शेतकऱ्यांनी परस्पर नवा फाटा तयार करून कालव्याची दिशाच बदलली असल्याचा धक्कादायक आणि अनोखा प्रकार पंढरपूर तालुक्यात निदर्शनास आला असून यामुळे शेतकरी बांधवात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे.


धरणे आणि कालवे हे शेतीसाठी वरदान ठरत असले तरी शेतकरी पाण्यासाठी कालाव्याशी काही छेडछाड करीत असल्याचे अनेकदा दिसते. पाटबंधारे विभागाची नजर चुकवून कालव्याची दारे परस्पर उघडली जातात अशा घटनाही सतत घडत असतात. शेतकऱ्यांनी परस्पर असे काही उद्योग केल्यास पाटबंधारे विभागाचे नियोजन कोलमडते आणि पाणी फुगवटा वाढून कालव्यालाही धोका उत्पन्न होत असतो. कालव्यातील पाणी आपल्याच शेताला मिळावे यासाठी काही शेतकरी नको तो 'उद्योग' करीत असतात. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात मात्र वेगळा आणि अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून पाटबंधारे विभागाला अंधारात ठेवत शेतकऱ्यांनी कालव्याची दिशाच बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. पाटबंधारे विभागाने याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पंढरपूर तालुक्यातून नीरा उजवा कालव्याचा जात असलेला फाटा बुजविण्याचाच प्रकार या शेतकऱ्याने केला आहे. दोन शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला अंधारात ठेवत आपल्या गटातील जवळपास एक हजार फुट लांबीचा कालव्याचा फाटा बुजवला आणि दुसऱ्याच बाजूने नवीन फाटा तयार करून कालव्याचा मार्गच बदलून टाकला आहे. पंढरपूर तालुक्यातील सोनके आणि लोणारवाडी येथे हा प्रकार उघडकीस आल्याने पाटबंधारे खात्याचे अधिकारी देखील अवाक झाले आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली असून सोनके येथील मधुकर कुंडलिक महारनवर आणि पळशी येथील विजय सत्यवान राजमाने या दोघांच्या विर्दोहात पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नागेंद्र ताटे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.


निरा उजवा कालवा शाखा ३ वरील वितरिका क्र.३ चे दुसरे दार हे पळशी फाटा ते लोणारवाडी असे आहे. या ठिकाणी सोनके हद्दीतील ६०८/१ व ६०८/२ या गटातील ७०० फूट निरा उजवा कालव्याचा फाटा मधुकर महारनवर याने, तर लोणारवाडी हद्दीतील गट नं. ९४ मध्ये ३०० फूट  विजय राजमाने याने पोकलँड मशीनच्या सहाय्याने बुजविल्याचे दिसून आले. (Farmers changed the direction of the canal, dug up the old one and made a new one) पाटबंधारे विभागाच्या परस्पर आणि त्यांना काहीही कळू न देता  पर्यायी फाटा तयार करून कालव्याचा मार्ग बदल्याचे दिसून आले आहे. मधुकर महारनवर आणि विजय राजमाने यांनी शासकीय मालमत्तेचे सुमारे ३५ हजारांचे नुकसानही करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत. कालव्यातून पाणी चोरून घेणे, कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अथवा त्याच्याशी हातमिळवणी करून जादा पाणी घेणे, कालव्याची दारे परस्पर उघडणे असे प्रकार होत असतात पण चक्क कालव्याची दिशाच बदलण्याचा अजब प्रकार केल्याचे पंढरपूर तालुक्यात दिसून आल्याने शेतकऱ्यात देखील हा चर्चेचा विषय बनला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !