शोध न्यूज : ऊस तोडणी मजुराला पैशासाठी गायब केल्याचे एक धक्कादायक प्रकरण सोलापूर जिल्ह्यात समोर आले असून याबाबत अठरा दिवसांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि आर्थिक व्यवहार यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. बीड, मराठवाडा विभागातील ऊस तोडणी कामगारांच्या अनेक टोळ्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामात राज्याच्या विविध भागात जात असतात परंतु अशा टोळ्या अथवा मुकादमाकडून ठेकेदाराची आर्थिक फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे घडत असतात. आधी रक्कम घेतल्याशिवाय या टोळ्या येत नाहीत त्यामुळे आधीच रक्कम देवून त्यांच्याशी करार करण्यात येतो. ऐनवेळी मात्र टोळीचा मुकादम बेपता होतो आणि टोळी ठेकेदाराची मोठी फसवणूक होते. अशा फसवणुकीतून पुढे अनेक प्रश्न तयार होतात आणि यातून काही गुन्हे घडल्याचे समोर येते. तोडणी कामगारांना कोंडून, डांबून ठेवल्याची प्रकरणे देखील अशा व्यवहारातूनच समोर येत असतात. अशीच काहीशी एक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली असून एका तोडणी कामगाराला गायब केल्याची फिर्याद पोलिसात पोहोचली आहे.
'ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे परत दे' म्हणत अठरा दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातून भारत पवार हा तोडणी कामगार बेपत्ता झाला आहे परंतु त्याला पळवून नेण्यात आल्याची तक्रार आता पोलिसात देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड गावाचे ऊस तोडणी कामगार भारत फुला पवार आणि संगीता भारत पवार हे दोघे पती-पत्नी मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील एका शेतात ऊस तोडणीचे काम करीत होते. अठरा दिवसांपूर्वी म्हणजे ६ फेब्रुवारी रोजी तोडणीचे काम सुरु असताना २८ वर्षीय भारत पवार हा बेपत्ता झाला होता आणि याची खबर मोहोळ पोलिसात नोंद करण्यात आली होती. ही तक्रार दाखल झाल्यानंतर मोहोळ पोलिसांनी भारत पवार याचा शोध सुरु केला. वास्तविक हा सर्व प्रकार पैशाच्या करणातून झाला असल्याचे समोर आले आणि भारत पवार याला काही लोकांनी पळवून नेले असल्याची बाब दिसून आली. पोलिसांनी तालखेड येथील मोहन मारुती पुरी, प्रशांत मोहन पुरी आणि प्रकाश विठ्ठल चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अठरा दिवसांनी हा गुन्हा मोहोळ पोलिसात दाखल झाला आहे.
सदर तीन आरोपी मोहोळ तालुक्यात ऊस तोडणीच्या ठिकाणी आले आणि त्यांनी 'ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे परत दे' अशी मागणी भारत पवार याच्याकडे केली. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हुतात्मा साखर कारखान्याची ऊस तोडणी करण्यासाठी भारत पवार याने उचल घेतली होती असे या आरोपींचे म्हणणे होते. त्यासाठी त्याला बोलावून घेतले आणि त्याला गायब करण्यात आले. पवार या तोडणी कामगाराला त्यांनी अज्ञात स्थळी ठेवले असून या तिघांच्या मोबाईलवर भारतची पत्नी संगीता हिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. (Sugarcane harvester kidnapped for money, Solapur District) तेंव्हापासून भारत याचाही संपर्क नाही आणि तो परत आलाही नाही त्यामुळे त्याची पत्नी संगीता पवार यांनी पोलीसात फिर्याद दिली आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(A shocking case of disappearance of a sugarcane cutting laborer for money has come to light in Solapur district and a case has been registered in the police station after eighteen days.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !