BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२३

वाळूचोराने तहसीलदारांच्या कानशिलात लगावली !

 


शोध न्यूज : वाळू चोरांची मग्रुरी आणखी एकदा समोर आली  असून त्याने तहसीलदार यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या कानाखाली वाजवण्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळूचोर किती मस्तवाल होत आहेत हेच या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.


अवैधरीत्या वाळूचा उपसा  आणि  वाळू तस्करी हा अलीकडील मोठा प्रश्न बनला असून वाळू चोरीचा राज्यभर धिंगाणा सुरु आहे. कितीही कारवाया केल्या तरी हा प्रकार थांबत नाही. प्रशासन कारवाई करीतच राहते पण वाळू तस्करीला लगाम लागत नाही. अनेकदा प्रशासनातील काही  लोक यात सहभागी असल्याचा आरोप देखील नेहमी होत असतो. प्रशासन कारवाई करायला गेल्यास वाळू तस्कर आपली दादागिरी दाखवतात आणि ही दादागिरी थेट प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्या जीवावर देखील उठल्याच्या घटना यापूर्वीच घडलेल्या आहेत. वाळू वाहतूक करणारे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली जाते आणि काही वेळा पोलिसाला चिरडून मारले जाते. महसूल विभागाचे पथक गेल्यास त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न होतो. आजवर अशा हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाळू चोरांना गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकले जाते, तडीपारीची कारवाई केली जाते परंतु वाळू चोरी अजिबात देखील कमी होताना दिसत नाही. आता तर वाळू चोराची हिंमत एवढी वाढली आहे की त्याने तहसीलदार यांच्या कार्यालयात घुसून तहसीलदार यांच्याच कानाखाली 'आवाज' काढण्याची हिम्मत दाखवली आहे.


जालना जिल्ह्यातील गोंडी आणि साष्ट पिंपळगाव येथे महसूल विभागाने वाळू चोरांवर कारवाई केली आणि त्यांचाकडील अवैध वाळूचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. ही मोठी कारवाई केल्याने पंकज सखाराम सोळुंके हा चिडून होता  त्यामुळे तो राग मनात धरून वाळू चोराने हा संतापजनक प्रकार केला आहे. अंबड तहसील कार्यालयात घुसून तहसीलादाराना शिवीगाळ करीत मारहाण करण्याची मजल या वाळूचोराची गाठली आहे.  तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी वाळू चोरीच्या विरोधात कडक कारवाई करीत वाळू साठा जप्त करून संभाजी खराद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याचा राग तसेच फेरफार मंजूर न केल्याच्या रागातून त्याने तहसीलदार यांना मारहाण करण्याचा हा प्रकार घडला आहे. तहसीलदार हे आपल्या कार्यालयात काम करीत बसले असताना सोळुंके आला आणि  थेट केबिनमध्ये घसू लागला. शिपायाने थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे न ऐकता आणि त्याला न जुमानता तो थेट तहसीलदार यांच्या केबिनमध्ये घुसला आणि शिवीगाळ सुरु केली. 


अचानक घडलेल्या या प्रकाराने बराच गोंधळ उडाला. आपल्या कामानिमित्त आलेले काही नागरिक देखील कार्यालयात उपस्थित होते. ते देखील गोंधळून गेले. सोळुंके कार्यालयात घुसताच थेट शिव्या देण्यास सुरुवात केली आणि 'तू माझा फोन का उचलत नाहीस? काल आमचा वाळूचा साठा कशासाठी जप्त केलास ? माझा फेरफार का मंजूर केला नाहीस?' असे प्रश्न विचारत तहसीलदार यांना शिवीगाळ करू लागला. हे प्रकरण केवळ शिवीगाळ करण्यापर्यंत थांबले नाही तर त्याने थेट दोन वेळा तहसीलदार यांच्या कानाखाली मारले. खांद्यावर देखील मारले. प्रकरण भलतेच वाढले असल्यामुळे उपस्थित नागरिक देखील मध्ये पडले आणि त्यांनी सोळुंके याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तहसीलदार यांना जीवे मारण्याची धमकी देत तेथून तो निसटला. त्यानंतर मात्र पोलिसांना कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस देखील तातडीने तेथे दाखल झाले आणि परिस्थितीची माहिती घेतली. तहसीलदार यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर सोळुंके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदरच्या घटनेने अंबड तहसील कार्यालयात एकच गोंधळ आणि खळबळ उडाली असून नागरिकांनी देखील तहसील आवारात मोठी गर्दी केली. वाळू चोरांची मजल आता तहसीलदार यांना कार्यालयात घुसून मारहाण आणि शिवीगाळ करण्यापर्यंत गेल्याचे चर्चेचा विषय बनला असून जिल्हाभर खळबळ उडाली आहे. (Sand thief  beaten and abused 
tehsildar in tahasil office) वाळू चोरांची मग्रुरी आणि मस्तवालपणा पाहून नागरिक देखील अवाक झाले आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !